कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून परिणामी आज सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. परवा शनिवारी सत्तरी तालुक्यात ढगफुटीसदृष्य स्थिती निर्माण होऊन कोसळलेल्या पावसामुळे तेथे पूर आला होता. तसेच डिचोली तालुक्यातील काही भागांतही पाऊस कोसळला होता.
काल रविवारीही साखळी, होंडा आदी भागात जोरदार पाऊस कोसळला. तसेच सत्तरीतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सदर भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, लोकांनी गडगडाटाच्यावेळी शेतीत तसेच मोकळ्या जागेत फिरू नये. तसेच गडगडाटाच्यावेळी उंच झाडे तसेच बांधकामाखाली राहू नये. विजा चमकत असताना तसेच वारे सुटलेले असताना वीज खांब तसेच झाडे, जुन्या वास्तूंजवळ उभे राहू नये. तसेच अशा वेळी विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.