राज्यात ४१ आयुष वेलनेस सेंटर सुरू होणार

0
11

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; आयुष इस्पितळाचे उद्घाटन ८ डिसेंबरला अपेक्षित

राज्यात डिसेंबरमध्ये होणार्‍या ९ व्या जागतिक आयुर्वेद कॉंग्रेसच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात पुढील महिन्यात ४१ आयुष वेलनेस सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात योगा थेरपिस्टची नियुक्ती केली जाणार आहे. आयुष मंत्रालयाच्या धारगळ येथील आयुष इस्पितळाचे उद्घाटन ८ डिसेंबरला होणे अपेक्षित आहे. तसेच, राज्यात आयुर्वेद पर्यटनाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आयुर्वेद कॉंग्रेसच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील जागतिक आयुर्वेद कॉंग्रेसनंतर राज्यातील आयुर्वेद क्षेत्रात आमूलाग्र बदल निश्‍चितच होणार आहेत. उत्तर गोव्यातील मुळगाव आणि दक्षिण गोव्यातील मडगाव येथील नियोजित आयुर्वेद इस्पितळांच्या कामांना गती दिली जाणार आहे. रायबंदर येथे जुन्या सरकारी इस्पितळाच्या आवारात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध योग उपचार पद्धतीचे बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात २३ ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा केला जाणार आहे. राज्यात दरवर्षी धन्वंतरी दिन साजरा केला जातो. यावर्षी धन्वंतरी दिन हा आयुर्वेद दिवस म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्रातून साजरा केला जाईल, असेही ते म्हणाले.