>> महोत्सवात शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन
नवोदित दिग्दर्शक आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चित्रपट परिवार या संस्थेतर्फे १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पणजी येथील गोवा मध्यवर्ती वाचनालय (सेंट्रल लायब्ररी, डायरेक्टरेट ऑफ आर्ट अँड कल्चर) या ठिकाणी ९ व्याा गोवा लघुपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
उद्या शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ४० पेक्षा अधिक देशातील लघुपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत, तर रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन दिवसांत या महोत्सवांमध्ये शंभरहून अधिक लघुपट पाहण्याची रसिकांना संधी मिळणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे. महोत्सवातील निवडक ३८ सर्वोत्कृष्ट लघुपटांना १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता पारितोषिके देण्यात येणार आहे. गोव्यातील नवोदित दिग्दर्शक निर्माते आणि कलाकारांचेही लघुपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी योगेश बारस्कर (९८९०८५०९०३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.