वादग्रस्त मामलेदार राहुल देसाई निलंबित

0
11

>> जमीन घोटाळा प्रकरण : अखेर सरकारला सुचले शहाणपण; पहिल्यांदा दोन ठिकाणी बदली, नंतर निलंबनाची कारवाई

बार्देश तालुक्यातील जमीन घोटाळा प्रकरणात कथितरित्या सहभागी असलेले बार्देशचे तत्कालीन वादग्रस्त मामलेदार राहुल देसाई यांना काल अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले. दक्षता खात्याने काल त्यासंबंधीची नोटीस काढली. एवढ्या मोठ्या घोटाळ्यात त्यांचा सहभाग आणि एसआयटीने गुन्हा दाखल केल्यानंतरही राहुल देसाई हे कित्येक दिवस बार्देश मामलेदार कार्यालयात कार्यरत होते. त्यानंतर त्यांची पर्वरी येथील सचिवालयात बदली आणि नंतर त्यांची मुरगाव येथे मामलेदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अखेर सरकारला शहाणपण सुचले आणि काल त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

राहुल देसाई यांचा जमीन घोटाळा प्रकरणात हात असल्याच्या आरोपावरून या प्रकरणी चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांना २९ सप्टेंबर रोजी अटक देखील केली होती; मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. असे असले तरी राहुल देसाई यांच्याविरुद्धचा गंभीर स्वरूपाचा आरोप लक्षात घेऊन शेवटी काल सरकारने त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

बार्देश तालुक्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील संशयितांशी हातमिळवणी करत जमिनींची खोटी कागदपत्रे तयार करून लोकांच्या जमिनी विकण्याच्या गुन्ह्यात राहुल देसाई हे कथितरित्या सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

बार्देश तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोकांच्या जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करून त्या बिगरगोमंतकीयांना विकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने प्रथम या जमीन घोटाळ्याचे तपासकाम गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडे चौकशीसाठी दिले होते; मात्र नंतर या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण चौकशीसाठी विशेष तपास पथकाकडे सोपवले होते.

या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची पोलिसांनी जबानी घेतली असता, त्यात या घोटाळ्यात काही सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी मदत केल्याचे उघड झाले होते. या घोटाळ्यात मामलेदार राहुल देसाई यांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना २९ सप्टेंबरला अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पीडित जमीनमालकांना न्याय मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या एका आयोगाचीही स्थापना करण्यात आलेली आहे.