आगामी पाच वर्षांत पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या २ लाखांहून अधिक संधी

0
12

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

येत्या पाच वर्षांत राज्यात पर्यटनातील आदरातिथ्यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, राज्यातील युवक-युवतींनी या सोने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोव्यातील युवकांनी या संधीकडे पाठ फिरवल्यास परराज्यातील लोक येऊन या संधीचा फायदा उठवतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक यांच्या बेती येथील कार्यालयाचे काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
राज्यातील युवक-युवतींनी या संधीचा फायदा घेण्यासाठी पर्यटनाशी संबंधित पदवीबरोबरच कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:ला अद्ययावत करावे. त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सरकारने औद्योगिक संघटनांच्या ३५ संस्थांबरोबर करार केलेला असून, आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल उद्योगाशी संबंधित संस्थांशीही कार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना हॉटेल उद्योगांमध्ये काम मिळू शकेल, असेही ते म्हणाले.