>> एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड; आज होणार अधिकृत घोषणा
मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दामोदर शिरोडकर हे काल बिनविरोध निवडून आले. निर्धारित वेळेत नगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. बुधवार दि. १२ रोजी अधिकृतपणे निर्वाचन अधिकारी याबाबत घोषणा करतील. आता १२ वर्षांनी मडगाव पालिकेत भाजपची सत्ता येणार आहे.
काल सकाळी दामोदर शिरोडकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. मुख्याधिकारी मान्युएल बार्रेटो यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. त्याला नगरसेवक दामोदर वरक, कामिलो बार्रेटो, रोनिता आजगावकर यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोधी निवडीची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता पालिका मंडळाची विशेष बैठक होणार आहे. त्यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून विकास गावणेकर उपस्थित राहतील.
कॉंग्रेसमधून प्रवेश केलेल्या ७ व गोवा फॉरवर्ड पक्षातून आलेल्या एका नगरसेवकामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या १६ झाली आहे. काल उमेदवारी अर्ज भरताना महेश आमोणकर, कामिलो बार्रेटो, राजू नाईक, दामोदर वरक, रोनिता आजगावकर उपस्थित होत्या. उपनगराध्यक्षा दीपाली सावळ या मात्र उपस्थित नव्हत्या.
भाजपच्या मूळ नगरसेवकांची दामोदर शिरोडकर यांच्या उमेदवारीस पसंती नव्हती. सदानंद नाईक यांनी या पदासाठी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यामुळे एकमत होेत नव्हते. परिणामी धोका टाळण्यासाठी सोमवारपासून सर्व १६ नगरसेवकांना बेतालभाटी येथील नानू रिसॉर्टमध्ये ठेवले असून, त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. काल दुपारी अर्ज भरल्यानंतर नगरसेवकांना पुन्हा बेतालभाटी रिसॉर्टमध्ये नेण्यात आले.
गोवा फॉरवर्डचा निवडणुकीवर बहिष्कार
माजी नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर व गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. काल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.