न्या. धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी शिफारस

0
9

देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश हे निवृत्तीच्या काही दिवस आधी आपल्यानंतरच्या सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला करतात. त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. सरन्यायाधीश उदय लळीत हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत.

केंद्र सरकारने विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्याबाबत पत्र पाठवले होते. सेवा ज्येष्ठतेनुसार, न्या. धनंजय चंद्रचूड हे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. त्यामुळे प्रचलित नियम आणि प्रक्रियेनुसार त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. न्या. चंद्रचूड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश होतील. नवीन सरन्यायाधीशांचा शपथविधी ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. न्या. चंद्रचूड हे सरन्यायाधीश झाल्यास त्यांचा कार्यकाळ हा १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार आहे.

उदय लळीत हे ८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. सरन्याधीश म्हणून त्यांना ७४ दिवसांचा कार्यकाळ मिळाला. लळीत यांनी २६ ऑगस्ट २०२२ रोजी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली होती.

वडिलांनंतर आता मुलगाही होणार सरन्यायाधीश
न्या. चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे देखील भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांनी २२ जानेवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालवधीत सरन्यायाधीशपदाची जबाबदारी पार पाडली. वडिलांच्या निवृत्तीनंतर आता ३७ वर्षांनी न्या. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होणार आहेत.