धरतीपुत्र

0
23

राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये पाच – सहा दशके खंबीरपणे पाय रोवून प्रादेशिक राजकारणाबरोबरच राष्ट्रीय राजकारणामध्येही आपला ठसा उमटवणार्‍या मुलायमसिंग यादव यांचे निधन ही एका प्रदीर्घ पर्वाची इतिश्री आहे. एकेकाळी अयोध्येतील कारसेवकांवर त्यांच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात कित्येकांचे प्राण गेल्याने ज्या मुलायमना ‘मौलाना मुलायम’ संबोधून हिंदुत्ववादी नेत्यांकडून त्यांची पदोपदी छीःथू केली जात होती, त्याच सिंग यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्याच योगी आदित्यनाथ सरकारकडून उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येतो, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळतात, ही ह्या नेत्याने निर्माण केलेल्या राजकीय ताकदीची आणि तळागाळाशी जोडल्या गेलेल्या भावबंधांची पावती आहे.
एकीकडे देशात भाजपा आणि कॉंग्रेस ह्या दोन राष्ट्रीय विचारधारा आमनेसामने खड्या असताना विविध राज्यांमधील ज्या मोजक्या नेत्यांनी त्यांना प्रादेशिक पर्याय मोठ्या हिंमतीने आणि परिश्रमाने उभे केले आणि प्रसंगी राष्ट्रीय पक्षांनाही शह दिला, अशा कर्तृत्ववान नेत्यांमध्ये मुलायमसिंग हे आघाडीचे नाव होते. डॉ. राममनोहर लोहिया आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नाव आणि वारसा सांगत अनेक मंडळी सत्तरच्या दशकात पुढे आली आणि राजकारणात त्यांनी आपले स्थान निर्माण केले. मुलायमसिंगांचे राजकीय क्षितिजावरील आगमनही अशाच प्रकारचे होते. मुळात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या मुलायमसिंगांनी कुस्तीपटू बनण्याच्या आपल्या बालपणीच्या स्वप्नाला तिलांजली तर दिली, परंतु आपल्या राज्यशास्त्राच्या ज्ञानाच्या बळावर राजकीय कुस्त्यांमध्ये असे काही डाव वेळोवेळी टाकले की भल्याभल्यांना चीतपट होण्यावाचून गत्यंतर उरले नाही. एकेकाळी ज्यांचे बोट धरून भारतीय लोकदलाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय ओळख निर्माण केली, त्या चौधरी चरणसिंग यांच्या अमेरिकेतून शिकून आलेल्या मुलाला, अजितसिंग यांना त्यांच्या अंत्यसमयी पक्षाची धुरा पत्करू न देता हेमवतीनंदन बहुगुणांच्या मागे उभे राहून मुलायमसिंगांनी असाच डाव एकेकाळी टाकला होता. देशात मंडल – कमंडलचे वारे वाहू लागताच सामाजिक न्यायाच्या नावाखाली नव्या जातीय समीकरणांनिशी पावले टाकण्यास किंवा हिंदुत्वाचा अरुणोदय होताना पाहून त्याविरोधात ठाम पवित्रा घेत यादव आणि मुसलमानांची मतपेढी आपल्या पाठीशी उभी करण्यात त्यांनी वेळोवेळी जे राजकीय कौशल्य दाखवले व त्यावर आपले राजकारण शेकून घेतले ते कमालीचे होते. अयोध्येत कारसेवेची घोषणा करणार्‍या हिंदुत्ववाद्यांना रोखण्यासाठी ‘परिंदा भी पर नही मार पायेगा’ म्हणत ललकारणारे मुलायम कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश देण्यास जसे कचरले नाहीत, तसेच आपल्या सामाजिक न्यायाच्या राजकारणामध्ये सुरवातीच्या काळात काशिरामांच्या मदतीने दलित आणि मागासवर्गीयांची साथ घेऊन घडवलेले सरकार भाजपच्या साथीला जाऊन पाडणार्‍या मायावतींवरील शासकीय अतिथीगृहातील हल्ल्याचे मूक साक्षीदार होऊन राहण्यासही बिचकले नाहीत. परिणामी मायावतींशी आणि त्यांच्या बहुजन समाज पक्षाशी निर्माण झालेले समाजवादी पक्षाचे हाडवैर शेवटपर्यंत टिकले आणि चर्चेत राहिले.
यादव आणि मुसलमानांच्या मतपेढीशी जशी त्यांनी आपल्या नव्या पक्षाची ओळख जोडली, तशीच अमरसिंगांसारख्या नेत्याच्या मदतीने आपल्या समाजवादी पक्षाच्या पाठीशी धनदांडग्यांची आर्थिक ताकदही उभी केली. सपाची सायकल खरी, परंतु ती अशा वेगाने पळत राहिली की बाकीचे बघतच राहिले. आपल्या राजकारणाची सूत्रे वेळीच आपल्या पुत्राकडे सुपूर्द करण्याची आणि त्याला राजकारणामध्ये स्थिरस्थावर करण्याची चतुराई त्यांनी दाखवली खरी, परंतु बंधू शिवपाल विरुद्ध पुत्र अखिलेश असा संघर्ष उभा राहताच पुत्रप्रेमालाही गुंडाळून ठेवण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. राजकीय पक्ष ही ‘शिवजी की बारात’ असते असे ते सांगत. खरोखरीच प्रादेशिक पक्षाला एवढ्या ताकदीने उभे करणे मुळीच सोपे नव्हते. सैफईसारख्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या ह्या माणसाने तरुण तुर्कापासून ‘नेताजी’ पर्यंत केलेला प्रवास थक्क करणारा आहे. आठ वेळा आमदार, सात वेळा खासदार, तीन वेळा उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेल्या ह्या महारथीने सामाजिक न्यायाच्या नावावर जातीपातींचे राजकारण जरूर केले, परंतु देशातील एक धुरंधर प्रादेशिक नेता म्हणून ते येणार्‍या काळातही दीर्घकाळ स्मरणात राहतील.