तेरेखाल-केरी, पेडणे येथील जलमार्गावरील डिझेलअभावी नदीच्या पात्रात अचानक बंद पडलेल्या फेरीबोटप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
तेरेखोल-केरी येथील फेरीबोट नदीच्या पात्रात डिझेलअभावी बंद पडण्याचा प्रकार गंभीर आहे. स्थानिक नागरिक आणि कर्मचार्याच्या प्रयत्नांमुळे डिझेलअभावी बंद पडलेली फेरीबोट धक्क्यावर आणण्यात आल्याने गंभीर दुर्घटना टळली.
डिझेलअभावी फेरीबोट अचानक बंद पडण्याचा प्रकार घडता कामा नये, यासाठी चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. नदी परिवहन खात्याकडे फेरीबोटीसाठी डिझेलची कमतरता नाही. फेरीबोटींना वेळोवेळी डिझेलचा पुरवठा केला जातो. विमाने सुध्दा इंधनासाठी अचानक उतरवली जातात. तथापि, डिझेलअभावी नदीच्या पात्रात बंद पडलेल्या फेरीबोट प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
राज्यातील पहिल्या सौरऊर्जेवरील फेरीबोटीचे उद्घाटन दि. १३ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. नदीपरिवहन खात्याकडून सौरऊर्जेवरील फेरीबोटीचे बांधकाम करण्यात आले आहे. तथापि, या सौरऊर्जेवरील फेरीबोटीचा उद्घाटन कार्यक्रम निश्चित करताना त्यांना अंधारात ठेवण्यात आल्याने नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली.
आपणाला सौरऊर्जेवरील फेरीबोटीच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती दूरध्वनीवरून सोमवारी देण्यात आली. कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण अजूनपर्यंत मिळालेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हा विषय मांडला जाणार आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.