>> कॉंग्रेसच्या ७ तर गोवा फॉरवर्डच्या एकाचा समावेश
मडगाव नगरपालिका राजकारणात काल रविवारी झालेल्या एका मोठ्या उलथापालथीत पालिकेतील विरोधी पक्षाच्या एकूण ८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये कॉंग्रेसचे ७ व गोवा फॉरवर्ड पक्षाच्या १ नगरसेवकाचा समावेश आहे. या ८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व हल्लीच कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत काल येथील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.
दिगंबर कामत हे कॉंग्रेसचे आमदार असताना त्यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या दामोदर शिरोडकर, दीपाली सावळ, सेंड्रा फर्नांडिस, दामोदर वरक, सीताराम ऊर्फ सिद्धार्थ गडेकर, सगुण नाईक, लता पेडणेकर या कॉंग्रेस नगरसेवकांनी तसेच विजय सरदेसाई यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या राजू नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पालिका कायद्यातील दुरुस्ती योग्य ः कामत
या घडामोडीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार कामत यांनी, गोवा नगरपालिका कायद्यात अध्यादेशाद्वारे करण्यात आलेली दुरुस्ती ही योग्य व कायद्याला धरूनच आहे, असा दावा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केला. त्या संबंधीपुढे बोलताना त्यांनी, ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांची सत्ता हे लोकशाहीचे तत्त्व असल्याचे सांगितले.
पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी आमदार दामू नाईक यांच्या उपस्थितीत पुढे बोलताना त्यांनी, गोवा महानगरपालिका तसेच नगरपालिका कायद्यात गुप्त मतदान घेण्याविषयीची कोणतीही तरतूद नाही. नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास ठराव आल्यास विशेष बैठक बोलावण्याची तरतूद आहे. पण मतदान गुप्त पद्धतीने घेण्याचा कुठेही उल्लेख नाही. विरोधकांनी या प्रकरणी लोकांची दिशाभूल करू नये, असेही कामत हे यावेळी म्हणाले. सरकारने अध्यादेशाद्वारे केलेल्या नगरपालिका कायदा दुरूस्तीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट होतील, असा दावाही कामत यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी बोलताना दामू नाईक यांनी राज्य सरकार चांगल्याप्रकारे प्रशासन चालवीत असल्याचे सांगितले. काही स्वयंघोषित विरोधी पक्ष नेते विनाकारण सरकारवर आगपाखड करीत असल्याचा आरोप केला. विजय सरदेसाई यांना नैराश्य आल्याचा दावा करून त्यामुळेच ते राज्य सरकारवर टीका करीत असल्याचे नाईक म्हणाले.
बुधवारी निवडणूक
मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवार दि. १२ रोजी होणार आहे. मंगळवार दि. ११ रोजी दुपारी १२ वाजेपर्यत अर्ज दाखल करायची मुदत आहे.