>> भारताने पाकिस्तान, जर्मनीला ठणकावले
काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुद्यावर तिसरया देशाची गरज नसल्याचे काल भारताने पाकिस्तान तसेच जर्मनाला ठणकावून सांगितले. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे पाकिस्तान आणि जर्मनीने म्हटले होते. त्यावर आक्षेप घेताना भारताने काश्मीर प्रश्न सोडवण्यास भारत समर्थ असून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणार्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करणे अधिक गरजेचे असल्याचे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि जर्मनीचे परराष्ट्र मंत्री ऍनालेना बॅरबॉक यांनी बर्लिनमध्ये शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राने भूमिका बजावावी असे म्हटले होते.
भारताने या संयुक्त पत्रकार परिषदेतील दोन्ही देशांच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला. काश्मीर हा पाकिस्तानसोबतचा द्विपक्षीय मुद्दा असून तिसर्या देशाला अथवा तिसर्या पक्षाला हस्तक्षेप करण्याची काहीही आवश्यकता नसल्याचे भारताने सांगितले. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात मागील अनेक दशकांपासून दहशतवाद सुरू असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लष्कर-ए-तोयबाने केलेल्या मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत बागची यांनी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अजूनही या हल्ल्यातील सूत्रधारांचा शोध घेत आहे. एखादा देश याचे गांभीर्य समजत नसेल, स्वार्थापोटी उदासीन असेल तर दहशतवादी हल्ल्यातील पीडितांवरही अन्याय करत असल्याचे भारताने म्हटले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण झाला असल्याचे वक्तव्य झरदारी यांनी करत जम्मू-काश्मीरवर तोडगा काढल्याशिवाय, दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही असे त्यांनी म्हटले होते.