‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पणजीतील रस्ते सुधारण्याचे काम हाती

0
13

स्मार्ट सिटी योजनेखाली शहरातील रस्ते सुधारण्याचे काम हाती घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजे १२३ कोटी रुपये खर्च करून शहरातील पाच किलोमीटर रस्ता स्मार्ट बनविला जाणार आहे. सुरुवातीला कांपाल येथील बालभवन ते काकुलो मॉलपर्यंतचा रस्ता स्मार्ट बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०१४ मध्ये पणजी महानगरपालिका क्षेत्राची निवड करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी योजनेखाली काही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तथापि, पणजी शहरात स्मार्ट सिटी म्हणण्यासारखा एकही प्रकल्प अजून झालेला नाही. पणजी शहरातील रस्ते पावसाळ्यात पाण्याखाली गेल्यानंतर हीच का स्मार्ट सिटी ? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जातो.

पणजी शहराला स्मार्ट बनविण्यासाठी रस्ते स्मार्ट बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १२३ कोटी रुपये खर्चून सांतइनेज भागातील ५ किलोमीटरचा रस्ता स्मार्ट केला जाणार आहे. या स्मार्ट रस्ता बनविण्याच्या कामाची सुरुवात बालभवन ते काकुलो मॉल या रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागल्यानंतर दुसर्‍या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. संपूर्ण पाच किलोमीटर रस्त्याचे काम जून २०२३ पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काकुलो मॉल ते मधुबन जंक्शन, मधुबन जंक्शन ते शीतल हॉटेल, विवांता जंक्शन ते आदर्श कॉलनी जंक्शन या भागातील रस्ते स्मार्ट सिटी योजनेखाली तयार केले जाणार आहेत. स्मार्ट रस्ता तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वीज, जलवाहिनी, दूरध्वनी केबलसाठी खास चॅनल तयार केला जात आहे. त्यामुळे कुठल्याही कामासाठी रस्त्यावर पुन्हा पुन्हा खोदकाम करावे लागणार नाही. नागरिकांसाठी पदपथ तयार केला जाणार आहे. हा स्मार्ट रस्ता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.