कोण मोडणार अमली पदार्थ माफियांचे कंबरडे?

0
24
  • – बबन विनायक भगत

गोव्यात अमली पदार्थ माफियांनी आपली पाळेमुळे एवढी घट्ट केलेली आहेत की ती उखडून टाकणे आता अशक्यप्राय बाब होऊन गेलेली आहे. अमली पदार्थ माफियांचे हे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विणले गेलेले आहे, आणि गोव्यासारख्या एका चिमुकल्या राज्याच्या राजकीय नेत्यांची डाळ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील माफियांशी शिजणे शक्यच नाही!

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. बहुतेक ९० च्या दशकातील असावी. मी एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याशी सहज गप्पा करीत असताना अमली पदार्थांचा विषय आला. त्यावेळी या निवृत्त पोलीस अधिकार्‍याने काढलेले उद्गार हे खूप काही सांगून जाणारे होते…
हा अधिकारी म्हणाला होता की, गोव्यात अमली पदार्थ माफियांनी आपली पाळेमुळे एवढी घट्ट केलेली आहेत की ती उखडून टाकणे आता अशक्यप्राय बाब होऊन गेलेली आहे. त्याचे म्हणणे होते की, अमली पदार्थ माफियांचे जाळे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर विणले गेलेले आहे, आणि गोव्यासारख्या एका चिमुकल्या राज्याच्या राजकीय नेत्यांची डाळ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील माफियांशी शिजणे शक्यच नाही!

ज्या ठिकाणी या ड्रग्स माफियांचे जाळे आहे, त्या-त्या ठिकाणचे राजकीय नेते, पोलीसकर्मी यांचा त्यांना छुपा पाठिंबाच आहे. कारण या माफियांकडून त्यांना कोट्यवधी रुपयांचे हप्ते मिळत असतात. आणि समजा असे असतानाही काही राजकीय नेते व पोलीसकर्मी यांनी ही समाजाला लागलेली कीड नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्यांचा विजय होणे केवळ अशक्य!
अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांचे कंबरडे मोडण्याची भाषा करणारे नेते हे या व्यवहारातील छोट्या-मोठ्या भुरट्यांना ड्रग्सची विक्री करताना पकडण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, असे त्या निवृत्त पोलीसकर्मीचे म्हणणे होते. आणि ते वेळोवेळी सिद्धही झालेले आहे…

सत्ताधारी भाजपाच्या एक तरुण नेत्या सोनाली फोगट यांना हल्लीच गोव्यातील हणजुण येथील वादग्रस्त कर्लिस या शॅकवजा रेस्टॉरंटमध्ये पाण्यातून अमली पदार्थ पाजून तिची हत्या करण्याची घटना घडली. भाजपाची सत्ता असलेल्या गोव्यात हे घडल्याने ही घटना भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. आणि या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्याची भीष्मप्रतिज्ञा करताना पुढील ३६५ दिवस गोव्यात अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त गोव्यातील किनार्‍यांच्या साफसफाईच्या कामाचा शुभारंभ करताना त्यांनी वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. मात्र, या मोहिमेत गोवा सरकारला किती यश येते व सरकार याबाबत किती गंभीर आहे या प्रश्‍नाचे उत्तर येणारा काळच देणार आहे.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास आल्यानंतर येथे अमली पदार्थ माफियांनी आपले जाळे विणले. अमली पदार्थ व्यवहाराच्या जोडीनेच येथे वेश्या व्यवसायही फोफावला, आणि आता तर राज्यात कॅसिनोवाल्यांचाही नंगानाच सुरू झालेला आहे. पूर्वी हा कॅसिनो नावाचा भस्मासुर पंचतारांकित हॉटेलांपुरता मर्यादित होता. मात्र, २ डिसेंबर १९९९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांनी राज्यात पहिल्या तरंगत्या कॅसिनोला परवानगी दिली आणि तद्नंतर बघता बघता राज्यात या कॅसिनो जुगाराने आपले हात-पाय पसरले. आता तर या जुगाराने एकप्रकारे राजधानी पणजीतील मांडवी नदीवरच अतिक्रमण केलेले आहे. आता आपल्या गोव्यात अमली पदार्थ व्यवहार, वेश्या व्यवसाय व कॅसिनो व्यवसाय हातात हात घालून सुखाने नांदताना दिसत आहेत.

अमली पदार्थ व्यवहाराबद्दल बोलायचे झाले तर राज्यात रशियन, नायजेरियन व इस्रायली ड्रग्स माफियांनी आपले जाळे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर विणले आहे. या तिन्ही देशांतील टोळ्यांबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल व अन्य युरोपियन देशांतूनही अमली पदार्थ घेऊन गोव्यात येणारे पर्यटक आहेत. त्याशिवाय नेपाळ या देशातूनही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गोव्यात आणले जात असतात. मात्र रशियन, नायजेरियन व इस्रायली ड्रग्स माफिया यांनीच खर्‍या अर्थाने राज्यात उच्छाद मांडलेला आहे. राज्याला अमली पदार्थांची ही लागलेली कीड जर सरकारला खर्‍या अर्थाने नाहीशी करायची असेल तर सरकारला या तिन्ही देशांतील ड्रग्स माफियांना गोव्यातून हुसकावून लावावे लागणार आहे. पण, गेल्या ३०-४० वर्षांच्या काळात वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी सरकारे आली आणि गेली; मात्र सत्तेवर आलेल्या एकाही सरकारला रशियन, नायजेरियन व इस्रायली ड्रग्स माफियांपैकी एकाचेही कंबरडे मोडण्यात अथवा त्यांना राज्यातून हुसकावून लावण्यात यश आले नाही यावरून या माफियांची पाळेमुळे आपल्या राज्यात किती खोलवर गेलेली आहेत हे दिसून येते.

हैद्राबाद पोलीस आयुक्तांचा आरोप
काही दिवसांपूर्वी हैद्राबाद पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी गोवा पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना त्यांना तपासासाठी हवे असलेल्या गोव्यातील काही ड्रग्स पॅडलर्सना अटक करण्याच्या बाबतीत गोवा पोलिसांकडून त्यांना हवे ते सहकार्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर गोवा पोलिसांनी सारवासारव करण्यापलीकडे काहीएक केले नाही. भाजपा नेत्या सोनाली फोगट यांची पाण्यातून अमली पदार्थ पाजून हत्या करण्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर हैद्राबादच्या पोलीस आयुक्तांनी गोवा पोलिसांवर वरील आरोप केले होते.
सोनाली फोगट यांच्याप्रमाणेच २००८ साली हणजुण येथील किनार्‍यावर ब्रिटिश युवती स्कार्लेट केलिंग हिची अमली पदार्थांचा ओव्हर डोस देऊन हत्या करण्यात आली होती. त्याशिवाय अमली पदार्थांच्या ओव्हर डोसमुळे अन्य कित्येक पर्यटकांचे राज्यात बळी गेले आहेत. त्याशिवाय आता या घातक अमली पदार्थांचे स्थानिक युवक-युवतींनाही व्यसन जडू लागले आहे. तीन महिन्यांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही अमली पदार्थ सापडल्याने खळबळ माजली होती. फार्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह तर अमली पदार्थांमुळे गेल्या २५-३० वर्षांपासून बदनाम झालेले आहे. शिवाय राज्यातील अन्य कितीतरी महाविद्यालयांतही अमली पदार्थ पोचले असल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी गोवा विधानसभा सभागृहातूनही केलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील किनारपट्टीवर रेव्ह पार्ट्यांनाही ऊत येऊ लागला असून राजकीय नेते व पोलीस यांचा आशीर्वाद व अभय मिळाल्याशिवाय अशा रेव्ह पार्ट्या होणे शक्य नसल्याचे राज्यातील विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचा बळी ड्रग्समुळे गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात अमली पदार्थविरोधी मोहीम उघडण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. याविषयी गोवा फॉरवर्ड पार्टीचे सर्वेसर्वा व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच हैद्राबाद येथील पोलिसांनी गोवा पोलीस त्यांना हवे असलेल्या ड्रग्स पॅडलर्सना पकडण्यासाठी सहकार्य करीत नसल्याचा जो आरोप केलेला आहे, त्या आरोपामुळे गोव्याचे नाव बदनाम झाले आहे. भाजपा नेत्या सोनाली फोगट यांची पाण्यातून अमली पदार्थ पाजून हत्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राकडून ड्रग्स माफियांवर कारवाई केली जावी यासाठी गोवा सरकारवर दबाव येऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ड्रग्स माफियांवर कारवाईची घोषणा केली असावी, असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात ड्रग्स माफिया व राजकीय नेते यांच्यात साटेलोटे असल्याचा एक अहवाल गोवा विधानसभेत सभागृह समितीने काही वर्षांपूर्वी सादर केला होता. मात्र, या अहवालानंतरही सरकारने कोणतीही पावले उचलली नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. आता प्रमोद सावंत यांनी ड्रग्स माफियांविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा केलेली असली तरी त्यात त्यांना यश येईल अशी शक्यता आपल्याला दिसत नसल्याचे सरदेसाई म्हणाले.
प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना यासंबंधी छेडले असता त्यांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत गंभीर असून त्यात त्यांना निश्‍चितच यश मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. अमली पदार्थांची विक्री करणार्‍या लोकांची धरपकड विविध किनार्‍यांवर सुरू झाली असून हणजुण येथील कर्लिससारख्या आघाडीच्या व अमली पदार्थांचे आगर बनलेल्या रेस्टॉरंटवर काही दिवसांपूर्वी कारवाई करून ते पाडण्यात आल्याचे तानावडे म्हणाले.

पोलिसांची भूमिका महत्त्वाची ः खंवटे
राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना यासंबंधी छेडले असता ते म्हणाले की, अमली पदार्थविरोधी मोहिमेत पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची आहे. काही महिन्यांपूर्वी दै. ‘नवप्रभा’ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळीही खंवटे यांनी असेच मत व्यक्त केले होते. पोलिसांना याप्रकरणी कडक भूमिका घ्यावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेलीच आहे. ती अशीच चालू राहील असा विश्‍वास व्यक्त करतानाच काही आजी-माजी आमदारांनी अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी आपणाकडे बरीच माहिती असल्याचे मत व्यक्त केलेले आहे. आता ती माहिती सरकारला देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही खंवटे यांनी पर्यटनमंत्री या नात्याने बोलताना केले. अमली पदार्थ हा गोव्याला भेडसावणारा गंभीर विषय आहे. आमची युवापिढी या अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापूर्वीच त्याविरुद्ध कडक पावले उचलावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

यासंदर्भात अमली पदार्थविरोधी पोलीस विभागाच्या एका निवृत्त पोलीस अधीक्षकाला विचारले असता तेे म्हणाले की, रशियन, नायजेरियन व इस्रायली ड्रग्स माफियांना गोव्यातून हुसकावून लावले तरच येथून अमली पदार्थ व्यवसाय खर्‍या अर्थाने उखडून टाकणे शक्य आहे. पण हे शिवधनुष्य कोण उचलणार हाच खरा प्रश्‍न असून त्याचे उत्तर सध्या तरी मिळणे कठीण असल्याचे ते म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री जर याबाबतीत गंभीर असतील तर त्यांना शुभेच्छाच द्याव्या लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.