दरवाजे (क्षणचित्रं… कणचित्रं…)

0
21
  • प्रा. रमेश सप्रे

मानवी देहाला द्वारावती नगरी म्हणतात. डोळे, कान, नाक, तोंड, मलमूत्रविसर्जन नि पुनरुत्पादनाची दारं या देहद्वारकेची आहेत. पण या दारातून आरोग्याचा वरदायी विष्णू आत येण्याऐवजी अनारोग्याचे शापदायी विषाणू मात्र आत घुसताहेत. यासाठी मनबुद्धीच्या दरवाजांची काळजी घ्यायला हवी.

पूर्वी अगदी लहानपणी चिऊ-काऊंचा परिचय नि प्रवेश जीवनात सर्वप्रथम व्हायचा. बाळाला काऊ-चिऊचं नाव घेऊन घास भरवले जात. अशाच काऊचिऊच्या गोष्टी नि गाणीही शिकवली जात. ते विश्‍वच वेगळं होतं, की त्यावेळी आपण दुसर्‍या ग्रहावर राहात होतो याचा आज संभ्रम पडतो. असो.

गोष्ट असायची चिमणीच्या मेणाच्या नि कावळ्याच्या शेणाच्या घराची. अचानक कोसळलेल्या पावसामुळं काऊचं घर वाहून जातं. चिऊचं मात्र टिकतं, कारण ते मेणाचं असतं. पावसात भिजणारा काऊ चिऊकडे येऊन म्हणतो-
‘दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड…’
चिऊताई उघडत मात्र नाही, कारण तिला आपल्या बाळाला तेल लावून न्हाऊ घालायचं असतं. नंतर तीट (काजळ) लावून निजवायचं असतं. तोपर्यंत पाऊस थांबतो. दारावर अनेकदा चोचीनं टक्‌टक् करून कावळाही कंटाळतो अन् निघून जातो.
खूप नंतर ही चिऊताई मंगेश पाडगावकरांच्या प्रतीकात्मक कवितेत मुलगी- युवती- स्त्री या रूपांत प्रकटते.


दार उघड दार, चिऊताई अगं दार उघड… कारण वारा आत आलाच पाहिजे, मोकळा श्‍वास घेतलाच पाहिजे. घरट्याबाहेर कावळे- बगळे- काटे- रस्त्यांचे फाटे असं सारं जरी असलं तरी मोकळ्या आकाशात उडलंच पाहिजे, यासाठी दार हे उघडलंच पाहिजे.
सार्‍या दरवाजांचं असंच असतं. ते दोन्ही बाजूंनी उघडतात. आतून बाहेर येता येतं, तसंच बाहेरून आतही जाता येतं. मनाचे दरवाजे उघडेच ठेवणं चांगलं, कारण माणसाचं मन हे पॅराशूटसारखं उघडल्याशिवाय कार्यच करू शकत नाही.
‘मुलांची आतली दिव्यता बाहेर व्यक्त करायला त्यांना मदत करणं (शिकवणं) हेच खरं शिक्षण’ असं म्हणताना स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीसमोर मुलांच्या मन-बुद्धीसमोरचे सूक्ष्म दरवाजे उघडलेले दिसत असले पाहिजेत.
संरक्षणासाठी किल्ल्यांचे महादरवाजे ठरावीक वेळी रोज बंद केले जात असत. अशाच संदर्भात पोटच्या पोरासाठी जिवाची पर्वा न करता एखादी हिरकणी गडाच्या कड्यावरून उडी मारते. तिच्या मातृत्वाला नि वात्सल्याला किल्ल्याचा भरभक्कम दरवाजा अडवू शकत नाही.

कृष्णाची द्वारका ही द्वारच होती भारतात प्रवेश करण्याचं. त्याकाळी अरबी व्यापारी घोडे, तर चिनी व्यापारी तलम रेशीम, कागद, कापड अशा वस्तू घेऊन यायचे. द्वारका समुद्रात बुडाल्यावर ते द्वार बनलं मुंबईचं गेट वे ऑफ इंडिया.
स्वर्गाच्या दाराचा उल्लेख अनेक धर्मग्रंथांत येतो. आपल्याकडून पाप झाल्यावर मनोमन पश्‍चात्ताप केला तर स्वर्गाचं दार उघडल्याशिवाय राहत नाही. तसंच एकवेळ सुईच्या नेढ्यातून (दोरा ओवतात ते छिद्र) उंट आरपार जाऊ शकेल, पण वाममार्गानं, भ्रष्टाचार करून श्रीमंत झालेली व्यक्ती मात्र जाऊ शकणार नाही, असं बायबलमध्ये म्हटलंय.

युद्धात मेलात तर स्वर्गाचं द्वार आपोआप तुमच्यासाठी उघडेल, या न्यायानं सगळे कौरव स्वर्गात गेले. पांडव हिमालयातील महाप्रस्थान मार्गावर मृत्युमुखी पडले. एकट्या युधिष्ठिराला सदेह स्वर्गप्रवेश मिळाला तो त्याच्या पराक्रमामुळे नव्हे तर चारित्र्याच्या, सद्गुणांच्या जोरावर.
याउलट तुकडोजी महाराजांसारखे राष्ट्रसंत म्हणतात- माझ्या झोपडीत केव्हाही या. सर्वांचं स्वागतच असेल. कारण मज्जाव करायला माझ्या गरिबाच्या झोपडीला दारच कुठंय?
सध्याची शहरी- बहुशिक्षित- नवश्रीमंत मध्यमवर्गीयांची घरं कशी आहेत? एकाच दरवाजाची. उघडून आत गेलात नि दरवाजा बंद केलात की तुम्ही आत- घरात बंद (ब्लॉक्ड इन्) नि सारं जग बाहेरच राहिलेलं (ब्लॉक्‌ड आउट) म्हणून घराला ब्लॉक म्हणतात तर!
सोयीसाठी कार्यालयं, पेट्रोल पंप इ.ना ‘इन अँड आउट’ अशी दोन प्रवेशद्वारं असतात. चिमणराव या चिं. वि. जोशींनी जन्माला घातलेल्या विनोदी पात्रानं एक जुनी गाडी घेतली. ती बंद झाली तर सुरू व्हायची नाही नि सुरू झाली तर बंद व्हायची नाही. ऑफिसातील सहकार्‍यांवर प्रभाव (इंप्रेशन) पाडण्यासाठी ऐटीत ‘इन्’ लिहिलेल्या दारातून त्यांनी दिमाखात एंट्री घेतली, पण गाडी बंदच होईना म्हणून ‘आउट’मधून इक्झिट केली. हा ‘इन’मधून येऊन ‘आउट’मधून बाहेर जाण्याचा सिलसिला गाडीतलं पेट्रोल संपेपर्यंत चालू राहिला.
सार्‍या लोकांना समजेना की चिमणराव अशा प्रदक्षिणा की चकरा का घालताहेत? असो.
‘देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ति चारी साधियेल्या’ असं अनुभवातून सांगणारे ज्ञानोबा ‘द्वारकेचा राणा पांडवाघरी’ असंही म्हणतात तेव्हा त्यांना परमेश्‍वराचं अखंड नामस्मरण हेच देवाचं द्वार असं म्हणायचं असतं.

मानवी देहाला द्वारावती नगरी म्हणतात. डोळे, कान, नाक, तोंड, मलमूत्रविसर्जन नि पुनरुत्पादनाची दारं या देहद्वारकेची आहेत. उपभोगांच्या अतिरेकामुळे या दारातून आरोग्याचा वरदायी विष्णू आत येण्याऐवजी अनारोग्याचे शापदायी विषाणू मात्र आत घुसताहेत. यासाठी मनबुद्धीच्या दरवाजांची काळजी घ्यायला हवी, तरच ‘सर्वे सन्तु निरामयाः’ ही ऋषींची भद्रवाणी साकार होईल.