कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस समितीने सदर आमदारांच्या निवासस्थानाबाहेर मोर्चा नेऊन निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्यासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. त्यानंतर आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील निवासस्थानाबाहेर मोर्चा आणणार असल्याचे वृत्त पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काल सकाळपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस उपअधीक्षक शिवेंद्र भूषण, मामलेदार लक्ष्मीकांत नाईक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी कामत यांच्या घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला होता; पण दिवसभरात कॉंग्रेस कार्यकर्ते तेथे फिरकलेच नाहीत. नंतर काही वेळाने आमदार दिगंबर कामत हे घराबाहेर पडले. दरम्यान, सर्वच फुटीर आमदारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.