गोवा फॉरवर्डचे दुःख

0
21

सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या चार जागा लढवून त्यातील तीन जिंकण्याचा नेत्रदीपक विक्रम नोंदवीत गोव्याच्या राजकारणामध्ये दमदार पदार्पण करणारा गोवा फॉरवर्ड पक्ष २०२२ च्या गेल्या निवडणुकीत मात्र अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागून आता शेवटी कॉंग्रेसच्या दारात विलीनीकरणासाठी केविलवाणा उभा आहे. पक्षाची ही स्थिती निर्माण होण्यास २०१७ च्या निवडणुकीनंतर क्षणिक स्वार्थाखातर पक्षाने अवलंबिलेली संधिसाधू नीतीच मुख्यत्वे कारणीभूत ठरली आहे. २०१६ मध्ये ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपण’ची आश्‍वासक ग्वाही देत हा पक्ष स्थापन झाला. त्यानंतरच्या म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्याने भाजपविरोधात रान उठवले. त्याने प्रभावित होऊन भाजपविरोधी विचारधारेच्या मतदारांनी ह्या प्रादेशिक पक्षाच्या पदरात भरभरून मते घातली आणि फातोर्डा, साळगाव आणि शिवोली हे तीन मतदारसंघ पहिल्याच प्रयत्नात जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. त्यातले दोन मतदारसंघ तर दिलीप परुळेकर आणि दयानंद मांद्रेकर ह्या भाजपच्या बड्या नेत्यांना धूळ चारीत पदरात पडलेे. मात्र, निवडणुकोत्तर घडामोडींमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही कॉंग्रेसचे काही ठरेनासे झाल्याने अस्वस्थ झालेल्या विजय सरदेसाई यांनी भाजपासमवेत सत्तेत शिरण्याचा अत्यंत आत्मघातकी निर्णय घेतला. त्यांच्या त्या अवसानघातामुळे पक्ष तर फुटलाच, पण जो विश्‍वास पक्षाविषयी भाजपविरोधी विचारधारेच्या मतदारांमध्ये निर्माण झाला होता, ज्या अपेक्षा उंचावल्या होत्या, तो विश्‍वास आणि त्या अपेक्षा पार धुळीला मिळाल्या. पुढे भाजपने आपली गरज संपताच गोवा फॉरवर्डला यथास्थित बाहेरचा रस्ता दाखवला आणि ना घरका ना घाटका अशी पक्षाची परिस्थिती झाली. पुढे निवडणुकीच्या तोंडावर जयेश साळगावकरांना पक्षात घेऊन आणि विनोद पालयेकरांना पक्षप्रवेशाचे आमीष दाखवून भाजपने सरदेसाईंनाच धोबीपछाड देऊ केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न सरदेसाई यांनी जरूर करून पाहिला, परंतु एकदा भाजपासमवेत हा पक्ष सत्तेत बसलेला असल्याने त्यावर विश्‍वास ठेवायला कोणीही तयार झाले नाही. गोव्यात नव्याने अवतरलेल्या तृणमूल कॉंग्रेससारख्या पक्षाने देखील कॉंग्रेसपेक्षा सरदेसाई यांनाच अधिक लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेसने तर आतापर्यंत गोवा फॉरवर्डला कटाक्षाने खड्यासारखे दूरच ठेवले आहे. आधी लुईझिन फालेरोंनी सरदेसाईंशी हातमिळवणी करण्यात खोडा घातला होता. नंतर गिरीश चोडणकरांनीही तोच कित्ता गिरवला. आज भले भाजपमध्ये जाता जाता राहिलेले कॉंग्रेसचे आमदार कार्लुस फरेरा यांना गोवा फॉरवर्डचा पुळका आलेला दिसत असला, तरी कॉंग्रेस पक्ष गोवा फॉरवर्डचे आपल्या पक्षात विलीनीकरण करण्यास तयार होऊन प्रदेश कॉंग्रेसची सारी सूत्रे विजय सरदेसाईंच्या हाती द्यायला राजी होईल असे वाटत नाही. सरदेसाई हे खरे तर मूळचे कॉंग्रेसजन. कॉंग्रेस पक्षाचे ते सचिवही होते. पण २०१२ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी द्यायलाही पक्षाने नकार दिला होता. परिणामी तेव्हा ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आणि भाजपचा उमेदवार कमकुवत असल्याने विजयी झाले. तेव्हापासून स्वतःच्या फातोर्डा मतदारसंघावर सरदेसाई यांनी पक्की पकड जरी बसवलेली असली, तरी पक्षाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात ते अपयशी ठरले आहेत. मयेसारख्या मतदारसंघांमध्ये विस्ताराचा त्यांचा प्रयत्न भाजपाने तत्पर हालचाली करून उधळून लावलेला पाहायला मिळाला.
खरे तर जेव्हा विधानसभेत तीन आमदार निवडून आले तेव्हा विरोधात राहण्याची कळ त्यांनी सोसली असती, तर कॉंग्रेस आमदारांच्या विकाऊ वृत्तीला उबगलेल्या कॉंग्रेसी विचारधारेच्या गोमंतकीय मतदाराने गोवा फॉरवर्डकडे आशेने पाहिले असते. परंतु २०१७ मध्ये भाजप सरकारची साथ दिल्याने गोवा फॉरवर्ड म्हणजे कॉंग्रेसची मते फोडण्यासाठी निर्माण झालेली भाजपचीच बी टीम अशी भावना काहींमध्ये निर्माण झाली ती पुसली गेलेली नाही. तो भाजपाविरोधात राहिला असता तर एकेकाळच्या युनायटेड गोवन्सचे नवे रूप म्हणून त्याकडे पाहिले गेले असते. विशेषतः ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ च्या घोषणेमध्ये ती आपुलकी भरलेली होती. परंतु केवळ सत्तेत शिरकाव करण्याची जी घाई सरदेसाईंनी केली त्याने आपल्याच पायावर कायमचा धोंडा मारून घेतला असेच म्हणायला हवे. आज राज्यात फातोर्ड्यापलीकडे गोवा फॉरवर्डला काहीही स्थान दिसत नाही. पक्ष टिकवायचा असेल तर त्याचा विस्तार आवश्यक आहे, परंतु त्यासाठी आवश्यक असलेले बळ सोबत नाही असा हा तिढा आहे. त्यामुळेच विलीनीकरणाच्या प्रस्तावाची वाट पाहात पक्ष कॉंग्रेसच्या दारी उभा आहे.