नूर अहमदच्या नेपाळ सीमेवर मुसक्या आवळल्या

0
11

>> फ्लॅटच्या बहाण्याने वास्कोतील शेकडो लोकांना कोट्यवधींना घातला होता गंडा

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने वास्को आणि आसपासच्या जवळपास २५० लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या नूर अहमद (३४ वर्षे) या भामट्याला नेपाळ आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाईत नेपाळ सीमेवर अटक केली आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे (ईओसी) वास्को परिसरातील ७० नागरिकांनी नूर अहमद याच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या फसवणूक प्रकरणात नूर अहमद याची पत्नी नाहिर ही देखील गुंतलेली असल्याने तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने जवळपास २५० लोकांची ५ लाख किंवा त्याहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. प्राप्त तक्रारींच्या आधारे एकूण ३.८० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

मूळचा बिहारचा रहिवासी असलेला नूर अहमद गेल्या ९ वर्षांपासून गोव्यात राहतो. फ्लॅटमालकांसमोर तो स्वत:ला प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून दाखवत असे आणि पीडितांच्या नावावर भाड्याने किंवा दीर्घ भाडेतत्त्वावर फ्लॅट घेत असे. सदनिका मालक आणि भाडेपट्टीवर सदनिका घेणारे व्यक्ती यांची प्रत्यक्ष भेट होणार नाही, याची तो पुरेपूर काळजी घेत होता. फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने तो पीडितांकडून ५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेत असे. पीडितांना फ्लॅट दीर्घ भाडेतत्त्वावर देण्यात येईल आणि ते ठरावीक कालावधीनंतर फ्लॅटचे मालक होतील आणि त्यांना मासिक परतावा देखील मिळेल, असे सांगितले जात होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यातून नूर अहमद फरार होता. अखेर त्याला नेपाळ सीमेवर पकडण्यात आले. काही फ्लॅट ऍग्रीमेंटमध्येही नाहिर हिचे नाव असल्याने त्याची पत्नी सहआरोपी असू शकते, अशी माहिती अधीक्षक वाल्सन यांनी दिली.

आमिषांना बळी पडू नका : पोलीस अधीक्षक
नागरिकांनी अधिक परताव्याच्या आमिषात पडू नये. संशयास्पद योजनांबाबत वेळीच पोलिसांकडे तक्रार करावी. आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदवलेल्या ८ गुन्ह्यांपैकी जवळपास ६ प्रकरणे अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीची आहेत. नागरिकांनी पॉन्झी योजनांच्या मोहात पडू नये, असे आवाहन निधीन वाल्सन यांनी केले आहे.