>> दिल्ली भेटीहून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी सात आमदारांबरोबर आपण दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जी भेट घेतली, त्या भेटीत राज्य मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे व नजीकच्या काळात राज्य मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल होण्याची शक्यता नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत पक्षाचे कार्य पुढे नेण्यासंबंधी व आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा पक्ष जिंकेल यासाठी काम करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मायकल लोबो हे आपल्या एका खासगी कामानिमित्त विदेशात गेलेले असल्याने ते दिल्लीतील या बैठकीला हजर राहू शकले नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आम्हाला भेटीसाठी वेळ देऊ शकले नाहीत. दिल्लीत अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत लोकसभेच्या दोन जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही तानावडे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीला गेलेल्या सात आमदारांपैकी संकल्प आमोणकर, डिलायला लोबो व केदार नाईक हे तीन आमदार अद्याप दिल्लीतच असून, ते राष्ट्रपती भवनला भेट दिल्यानंतर बुधवारी गोव्यात परतणार आहेत. उर्वरित रुडॉल्फ फर्नांडिस, दिगंबर कामत, राजेश फळदेसाई व आलेक्स सिक्वेरा हे काल गोव्यात परतले.