पंतप्रधानांच्या वाढदिनानिमित्त आज राज्यात १८ ठिकाणी कार्यक्रम

0
7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज दि. १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त २ ऑगस्टपर्यंत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपने केले आहे. या दरम्यान गोव्यातही एकूण १७ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना दिली. हे कार्यक्रम राज्यातील चाळीसही मतदारसंघात आयोजित केले जाणार आहेत.
यानिमित्त नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य तसेच देशाचे प्रधानमंत्री बनल्यानंतर त्यांनी केलेले कार्य याचा आढावा घेणारे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून मोदी यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांचीही माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन पणजी, म्हापसा, मडगाव व कुडचडे या चार मतदारसंघात करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिरांचे आयोजन
वरील काळात गोव्यातील चाळीसही मतदारसंघांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदारसंघांत वृक्षारोपणाचाही कार्यक्रम होणार आहे. तसेच मतदारसंघांतील विशेषजांना कृत्रिम अवयव, व्हिल चेअर, कर्णबधीरांना ऐकू येण्यासाठीची अवजारे देण्यात येणार आहेत. तसेच टी. बी. रूग्णांना दत्तक घेऊन त्यांची सेवा करणे यावरही लक्ष देण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत देशांतून टीबीचे निर्मूलन करण्याचा कार्यक्रमाचा हा भाग असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

स्वच्छता मोहिम
त्याचबरोबर दर एका मतदारसंघात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत कचरा उचलणे, तसेच नद्या, नाले, तलाव यांतील कचरा साफ करणे आदी काम हाती घेण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी भाजपचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.