आमदारांच्या बंडखोरीला कॉंग्रेस पक्षच जबाबदार

0
16

>> रिव्होल्युशनरी गोवन्सचा आरोप

राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून कॉंग्रेस पक्षातल्या आमदार फुटीचे नाटक सुरू होते, ते काल संपले. आठ आमदारांच्या बंडखोरीला कॉंग्रेस पक्षच जबाबदार असून, कॉंग्रेसने हा केवळ जनतेचाच विश्‍वासघात केलेला नसून, त्यांनी देवांची सुद्धा थट्टा चालवली आहे. देव त्यांना योग्य ती शिक्षा देईल, अशी प्रतिक्रिया रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी व्यक्त केली.
पणजीत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहसंस्थापक विश्वेश नाईक आणि सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष असल्याचे चित्र उभे केले गेले. आरजी पक्षाला शून्य जागा, आरजी फक्त ५०० मतांचा पक्ष आसा अपप्रचार करण्यात आला. लोकांची दिशाभूल करण्यात आली आणि आज ज्या उमेदवारांना जनतेने विश्वासाने निवडून आणले, त्यांनीच आज जनतेचा विश्वासघात केला असल्याचे मनोज परब यांनी यावेळी सांगितले.

आमदारांच्या पक्षांतरासाठी कॉंग्रेस पक्षाने भाजपला जबाबदार धरणे हे योग्य नाही. कॉंग्रेस पक्षाने आपली तत्वे विकली आहेत. आमचाही एक आमदार आज निवडून आलेला आहे; मात्र तो आपली तत्वे, आपले विचार सोडून दुसर्‍या पक्षात गेला नाही, तो आपल्या जनतेबरोबर एकनिष्ठ राहिला आहे, असे परब म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने आज परत एकदा गोव्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. संपूर्ण लोकशाहीचा आज खून झालेला आहे. ज्या पक्षाला लोकांनी मतदान करून पुन्हा निवडून आणले, त्या आमदारांनी लोकांचा विश्वासघात करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. आज प्रत्येक पक्ष गोवा राज्याला राजकारणाची प्रयोगशाळा समजतो आहे आणि याचाच दुष्परिणाम गोव्यातील सामान्य जनतेला भोगावा लागतो, असे विश्‍वस नाईक म्हणाले.