>> हरयाणातील खाप महापंचायतीची मागणी
भाजप नेत्या, अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी हरयाणातील हिसारमध्ये आयोजित खाप महापंचायतीमध्ये काल करण्यात आली. या मागणीची पूर्तता न झाल्यास येत्या २४ सप्टेंबर रोजी जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोनाली फोगट यांचा २३ ऑगस्ट २०२२ रोजी हणजूण येथे मृत्यू झाला होता. सोनाली फोगट यांना अमलीपदार्थ पाजण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सोनाली फोगट यांचा स्वीय सहकारी सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग यांच्याबरोबर आणखी तीन जणांना अटक केली आहे. मयत सोनाली हिची मालमत्ता हडप करण्यासाठी खून करण्यात आल्याचा आरोप कुंटुबियांकडून केला जात असून सोनाली हिच्या कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.
रविवारी सकाळी हिसारच्या जाट धर्मशाळेत हरयाणा व इतर भागातील खापांचे सदस्य ‘सर्व जातीये, सर्व खाप महापंचायत’ या बॅनरखाली एकत्र आले. हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या सोनाली फोगट कुटुंबाच्या मागणीला महापंचायतीने जोरदार पाठिंबा दिला. सरकार तिच्या कुटुंबीयांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मयत सोनाली हिची मुलगी यशोधरा हिने केला आहे. सरकार आमची सीबीआय चौकशीची मागणी ऐकत नाही. आपणालासुद्धा कोणतीही सुरक्षा दिलेली नाही. मी कुटुंबासोबत राहत असले तरी मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षिततेची गरज आहे. केंद्र, हरयाणा आणि गोव्यातही भाजपचे सरकार आहे. तरीही आपल्या कुटुंबीयाच्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही, असा सवाल यशोधरा यांनी केला आहे.