गणेशभक्तांच्या गर्दीने माटोळी बाजार गजबजले

0
24

>> माटोळी साहित्याच्या दरांमध्ये वाढ; दोन दिवसांत होणार लाखोंची उलाढाल

गणेशचतुर्थीचा सण केवळ एका दिवसावर येऊन ठेपल्याने राज्यातील गणेशभक्तांची तयारीसाठी लगबग वाढली आहे. राजधानी पणजीसह राज्यातील बाजारपेठा चतुर्थीसाठी लागणार्‍या विविध साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. चतुर्थी सणावेळी महत्त्वाची ठरते ती माटोळी. या माटोळी बाजाराला राज्याच्या विविध भागांत प्रारंभ झाला असून, भाविकांनी हरणफुले, केवनीचे दोर, सुपारीचे कात्रे यासह अन्य साहित्याच्या खरेदीचा जोर लावला आहे. मात्र या साहित्याचे दर वाढल्याने भाविकांना आपला खिसा रिकामा करावा लागत आहे.

श्रीगणेश चतुर्थी हा एक प्रमुख सण आहे. ३० रोजी श्रीगणेश मूर्तीचे घरोघरी आगमन होणार असून, ३१ रोजी विधिवत पूजन केले जाणार आहे राज्यभरात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रीगणेश चतुर्थीसाठी पारंपरिक माटोळीला प्राधान्य दिले जात आहे.

माटोळीचा बाजार चतुर्थीच्या आधी दोन दिवस राज्यभरात सर्वत्र भरवला जातो. राजधानी पणजीत मार्केटच्या मागे हा बाजार भरवण्यात आला आहे. या ठिकाणी माटोळीसाठी लागणार्‍या विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत या बाजारात गर्दी दिसून येत होती. माटोळी बाजार आणि मांडवी तीरावरील अष्टमेची फेरी यामुळे डी. बी. बांदोडकर मार्गावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती.

मागच्या वर्षीपेक्षा यंदा माटोळी साहित्याच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. नारळाची पेण ३०० ते ८०० रुपये, सुपारीचे कात्रे ३०० रुपयांपासून सुरुवात, केळीच्या शिरत्या पन्नास नग २०० रुपये, केवनीचे दोर ५० ते १०० रुपये, कांगल्या ५० ते १०० रुपये, मावळींगे ५० ते १०० रुपये, घागरी १०० रुपये, माटा ४० ते ६० रुपये जोड, तोरिंजन १०० रुपये, अंबाडे पन्नास १०० रुपये, चिबूड ८० रुपये, निरपणस १०० ते ३०० रुपये, गौरी चुडी ५० रुपये, हळदीची २५ पाने ५० रुपये, कैर्‍या १०० रुपये एक वाटा, लाह्या २० रुपये १०० ग्रॅम असा दर आहे.

चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर विविध फळांची देखील चढ्या दराने विक्री होत आहे. सफरचंद १२० ते १४० रुपये, सिताफळ १२० रुपये, डाळिंब १६० रुपये, संत्री २५०, पेरू २०० रुपये प्रति किलो, तर केळी ६० ते ८० रुपये प्रति डझन अशा दरांत उपलब्ध आहे.