>> अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त
आगामी २५ वर्षे आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची आहेत; कारण भारत स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. म्हणूनच येणार्या २५ वर्षांत देशाची हरतर्हेने प्रगती कशी होईल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा आणि जनतेची साथ मिळायला हवी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील नागरिकांना राष्ट्रविकासासाठी त्यांनी ‘पंचप्रण’ ही संकल्पना सांगितली. त्यापैकी पहिला प्रण किंवा संकल्प हा विकसित भारत हा आहे. आगामी २५ वर्षांमध्ये भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी भारत एक विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून नवव्यांदा ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांना २१ तोफांची सलामीही देण्यात आली. यावेळी त्यांनी ८३ मिनिटे भाषण केले. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला. सुरुवातीला त्यांनी देशवासियांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज भारताचा तिरंगा जगाच्या कानाकोपर्यात अभिमानाने फडकतोय. भारतातच नाही तर जगभरात कानाकोपर्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिकांनी संपूर्ण गुलामगिरीचा काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला. भारताचा असा एकही कोपरा नाही जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. आज सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना, त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे. मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ब्रिटीश राजवटीचा पाया हादरवणार्या आपल्या असंख्य क्रांतिकारकांचा देश कृतज्ञ आहे, असे मोदी म्हणाले.
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि कुटुंबवाद यावरही मोदींनी भाष्य केले. लोक गरिबीशी झुंजत आहेत. एकीकडे असे लोक आहेत, ज्यांना राहायला जागा नाही, तर दुसरीकडे असे लोक आहेत, ज्यांना चोरीचा माल ठेवायला जागा नाही. ही परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे भ्रष्ट्राचाराविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढायचे आहे. भ्रष्टाचार देशाला पोकळ करत आहे. ही लढाई जिंकता यावी, यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.
पंतप्रधानांचे आगामी २५ वर्षांसाठी ‘पंचप्रण’ :
विकसित भारत : पहिला प्रण म्हणजे विकसित भारत. आता देश एक मोठा संकल्प घेऊन चालला असून, तो मोठा संकल्प विकसित भारताचा आहे.
ख् गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका : दुसरा प्रण म्हणजे आपल्या मनाच्या कोणत्याही कोपर्यात गुलामगिरीचा एकही अंश राहू देऊ नका. या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाका.
ख् आपल्या वारशाचा अभिमान बाळगा : तिसरा प्रण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हाच वारसा आहे, ज्याने भारताला सुवर्णकाळ दिला.
ख् एकतेचे सामर्थ्य : चौथा प्रण म्हणजे एकता आणि एकजुटता. १३० कोटी देशवासीयांमध्ये एकता असावी, आपला आणि परका असा भेद नसावा. एक भारत आणि श्रेष्ठ भारताची ही प्रतिज्ञा आहे.
ख् नागरिकांची कर्तव्ये : पाचवा प्रण हा नागरिकांकडून कर्तव्य पालन. त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचाही समावेश आहे.