‘भारत’ची जाज्वल्य पत्रकारिता आता चिरंतन

0
20

>> कै. गो. पुं. हेगडे देसाईंच्या ‘भारत’चे डिजिटायझेशन

पोर्तुगीज राजवटीमध्ये तब्बल ३६ वर्षे आपल्या ‘भारत’ या नियतकालिकाद्वारे राजसत्तेला हादरा देणार्‍या कै. गोविंद पुंडलिक हेगडे देसाई यांच्या झुंजार पत्रकारितेला आता चिरंतन स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘भारत’च्या अंकांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल सचिवालयात त्याचे अनावरण करण्यात आले.

‘भारत’च्या अग्रलेखांच्या दोन खंडांचे प्रकाशन यापूर्वी गोमंतक मराठी अकादमीतर्फे कै. शशिकांत नार्वेकर यांच्या प्रयत्नांतून झाले होते. ते दोन्ही खंडही डिजिटाईझ करण्यात आले आहेत.
भारतकार हेगडे देसाई प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड. गोविंद हेगडे देसाई आणि यतीन हेगडे देसाई यांच्या प्रयत्नांतून हा डिजिटायझेशन प्रकल्प साकारण्यात आला आहे. त्यासाठी सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या विकिमीडिया फाऊंडेशनच्या सहयोगी संस्थेने आर्थिक पाठबळ पुरवले. या संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुबोध कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे डिजिटायझेशन करण्यात आले. भारतच्या अंकांचे स्कॅनिंग करण्यासाठी गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा.विनय मडगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रावणी परब व श्रीधर राऊत या विद्यार्थ्यांनी ‘भारत’च्या अंकांची बारा हजार पाने आठ दिवसांत स्कॅन करून डिजिटायझेशनला मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे १९१२ ते १९४९ या प्रदीर्घ कालखंडातील ‘भारत’ची पत्रकारिता अभ्यासण्याची संधी जगभरातील अभ्यासकांना प्राप्त झाली आहे.