बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींची सुटका

0
27

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ११ कैद्यांची काल सुटका करण्यात आली. या सर्वांना गोध्रा येथील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. या सर्वांची गुजरात सरकारच्या माफी नीती योजनेंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली. हे सर्व दोषी २००२ मध्ये बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.

गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात मार्च २००२ मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला होता, तर कुटुंबातील इतर सहा सदस्य कसेतरी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले होते.
मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सर्वांवर बिल्कीस बानोवर बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या सर्व दोषींनी १५ वर्षे तुरुंगवास भोगला होता.