>> संशयाचे वलय आई-वडिलांभोवतीच
>> पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात
बार्देश तालुक्यातील थिवीजवळील शिरसई येथे तीन महिन्यांच्या चिमुकल्या बालिकेची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार काल सकाळी उघडकीस आला. सदर बालिकेच्या देहावर विविध ठिकाणी जखमा आढळून आल्या असून, संशयाची सुई आई-वडिलांकडे वळली आहे; मात्र तपासात अद्यापपर्यंत पोलिसांना ठोस काही निष्पन्न झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जिया गोंडलेकर असे मृत बालिकेचे नाव आहे. तिचे वडील पेडणेतील असून, आईचे माहेर थिवी येथे आहे. दोघांचाही अंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. सध्या हे दांपत्य शिरसई भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्या दाम्पत्याला पाच वर्षांची आणखी एक मुलगी आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी सदर मोठी मुलगी वडिलांच्या मूळ गावी पेडण्यात होती.
काल पहाटे ३.३० वाजता आई-वडिलांनी जियाला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दोघेही तिच्यासह कोलवाळ पोलीस स्थानकात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने जियासह उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय गाठले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत जियाच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. त्यामुळे संशयाचे वलय तिच्या पालकांभोवतीच फिरत आहे. पोलिसांनी या प्रकरणी बालिकेच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे. जियाला रुग्णालयात न नेता तिला तिचे पालक पोलीस स्थानकावर का घेऊन आले, याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. जियाच्या पालकांची कसून चौकशी करण्यात आली; मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही. पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना कोलवाळ पोलीस स्थानकावर दाखल झाले. तसेच त्यांनी चौकशीचा आढावाही घेतला. या घटनेनंतर श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले होते. उपअधीक्षक जिबवा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजिक पुढील तपास करीत आहेत.