महाराष्ट्रातील शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे काल पहाटे कार अपघातात निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते; मात्र खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पुढे जाणार्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली. त्यात त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. तब्बल तासाभरानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.