‘मंकीपॉक्स’चे सावट

0
30
  • डॉ. मनाली महेश पवार

कोरोना महामारीने गेली दोन-अडीच वर्षे जगभरात जनजीवन विस्कळीत केले. या कोरोना व्हायरसचा परिणाम स्वास्थ्यावर, आर्थिक बाबींवर, वैयक्तिक व सामाजिक बांधिलकीवर अशा रीतीने पडला की, मनुष्य काहीसा भित्रा बनून गेला. ‘मंकीपॉक्स’ हेही एक व्हायरल इन्फेक्शन असले तरी त्याची तितकीशी भीती बाळगण्याची गरज नाही. ब्रिटन, युरोप, अमेरिका तसेच भारतातही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंकीपॉक्स म्हणजे काय, या रोगाची लक्षणे कोणती आणि आपण याबाबत काय खबरदारी घेऊ शकतो याबाबत या लेखातून जाणून घेऊया.

कोरोना महामारीने गेली दोन-अडीच वर्षे जगभरात जनजीवन विस्कळीत केले. या कोरोना व्हायरसचा परिणाम स्वास्थ्यावर, आर्थिक बाबींवर, वैयक्तिक व सामाजिक बांधिलकीवर अशा रीतीने पडला की, मनुष्य काहीसा भित्रा बनून गेला. सर्दी-खोकल्यासारखे ऋतुपरत्वे येणारे आजारही त्याला आता गंभीर वाटू लागले आहेत. येथे मधुमेह, हृदयविकाराची भीती नाही; पण सर्दी-तापाची धास्ती घेतली आहे. अशा वातावरणात आता परत ‘मंकीपॉक्स-मंकीपॉक्स’ अशा आजाराची भुणभुण ऐकू येत आहे. या आजाराच्या चाहुलीने किंवा लक्षणांवरून कुणीही गोंधळून जाऊ नका. हेही एक व्हायरल इन्फेक्शन असले तरी त्याची तितकीशी भीती बाळगण्याची गरज नाही. ब्रिटन, युरोप, अमेरिका तसेच भारतातही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंकीपॉक्स म्हणजे काय, या रोगाची लक्षणे कोणती आणि आपण याबाबत काय खबरदारी घेऊ शकतो हे या लेखात जाणून घेऊ.
मंकीपॉक्सचा संसर्ग आतापर्यंत ७५ हून अधिक देशांत पोहोचला आहे. याच्या येण्याने कोरोना विषाणूसोबतच आता जगासमोर आणखी एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. मात्र आतापर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. कांजण्यांसारखीच लक्षणे असलेली मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणे आफ्रिकेत आढळून आली आहेत. सध्या यावर कोणताही निश्‍चित असा इलाज नाही. परंतु असे मानले जाते की, कांजण्यांमधून बरे झालेल्या किंवा लसीकरण झालेल्या लोकांना मंकीपॉक्स होण्याचा धोका कमी आहे.

१९५८ मध्ये पहिल्यांदा या विषाणूची लक्षणे समोर आणली गेली. तेव्हापासून आतापर्यंत प्रथमच मंकीपॉक्सचे रुग्ण एवढ्या वेगाने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकतेच हा आजार म्हणजे ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी’ अर्थात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला आहे. मात्र जगभरातील रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही हा मंकीपॉक्स आजार ही जागतिक महामारी नव्हे. कारण जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत याचा संसर्ग अगदीच कमी आहे व मृतांचा आकडाही अगदीच नगण्य आहे. लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्काही नाही. त्यामुळे मंकीपॉक्स महामारी नाही.

मंकीपॉक्समुळे मृत्यू होत नाही. मात्र प्रथमच काही संक्रमितांचा मृत्यू झाला असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. कदाचित त्याचे कारण कोरोना असू शकते. कोविडमुळे काही लोकांच्या फुफ्फुसावर परिणाम झालाय. अनेक संसर्गजन्य रुग्णांमध्ये सीओपीडीची तक्रार होती. मंकीपॉक्सनंतर न्यूमोनिया व कोविडमुळे फुफ्फुसे कमकुवत झालेली असल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असावा. मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित केले नाही तरी प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?
मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मीळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे होतो, त्याच विषाणूचा हा एक उपप्रकार आहे. एकेकाळी हा रोग माकडांमध्ये पसरला होता म्हणून त्याला ‘मंकीपॉक्स’ असे नाव पडले. मंकीपॉक्सचा विषाणू झुनोसिसच्या श्रेणीमध्ये गणला जातो. म्हणजेच हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. त्याचा संसर्ग मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या ‘पू’व्यतिरिक्त, संसर्गित प्राण्यांची विष्ठा आणि मूत्र यांच्या संपर्कातून पसरतो. प्राण्यांना जर हा आजार झाला असेल आणि त्याच्याशी थेट संबंध आला तर माणसाच्या शरीरात हा विषाणू प्रवेश करू शकतो. तसेच रुग्णाने वापरलेले कपडे किंवा रुग्णाशी थेट संबंध आल्यानेही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत याची लक्षणे दिसतात. समलैंगिक नागरिकांना या रोगाचा धोका अधिक असल्याचे बोलले जाते, परंतु त्याला आधार असा नाही. यापूर्वीही हा आजार लैंगिक संबंधातून पसरतो हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या निरीक्षणात या रोगाचा संसर्ग पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुषांनाही होत असल्याचे म्हटले आहे. हा व्हायरस तीन मार्गांनी पसरतो.

पहिला म्हणजे, प्राण्यांकडून माणसांमध्ये संक्रमित होणे. संक्रमित प्राण्याच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याला या विषाणूची बाधा होते. दुसरा मार्ग म्हणजे, व्यक्तीचा स्कीन टू स्कीन टच. संक्रमित रुग्णाचे कपडे, भांडे किंवा बेडशीटच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. तिसरे म्हणजे, शरीरसंबंधाच्या माध्यमातून. असुरक्षित शरीरसंबंधामुळे हा विषाणू पसरतो. या आजाराचे विषाणू हवेतून पसरत नाहीत.

मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे
उच्च ताप, डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कंबरदुखी, पाठदुखी, सर्दी, थकवा, ग्रंथीमध्ये सूज, लहान-लहान द्रवाने किंवा ‘पू’ने भरलेले फोड (तोंड, दात आणि पायांवर).

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांदरम्यान लिम्फॅडेनोपॅथी कांजिण्यांपासून मंकीपॉक्सला वेगळं करते. मंकीपॉक्समुळे शरीरावर पुरळ किंवा व्रण येतात. त्याला बहुतांश लोक कांजिण्या समजतात. मंकीपॉक्समध्ये आलेले फोड छाले आणि घाव बनतात; पण कांजिण्यांच्या बाबतीत असे होत नाही.

मंकीपॉक्स धोकादायक आहे का?
मंकीपॉक्स हा एक ऑर्थोपॉक्स श्रेणीतील व्हायरस आहे. त्यामुळे घशात खवखवणे, ताप आणि त्वचेवर डाग पडणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. जर फार काही गुंतागुंत नसेल तर याहून जास्त काहीही होत नाही. या व्हायरसमध्ये दोन स्ट्रेन दिसून येतात. एक असतो वेस्ट ऑफ्रिकन आणि दुसरा कॉंगो बेसिन स्ट्रेन. भारतात आणि आशियायी देशांमध्ये सध्या जो व्हायरस पसरला आहे तो काही घातक दिसत नाही. त्यामुळे मृत्यू झाल्याच्या नोंदी नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाला आणि त्याला फुफ्फुसाशी संबंधित इतर काही समस्या असेल तर न्यूमोनिया होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. मात्र केवळ मंकीपॉक्समुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.

पंकीपॉक्स कांजिण्यासारखा आहे का?
मंकीपॉक्सचा उष्मायन काळ कांजिण्यांच्या तुलनेत थोडा जास्त असतो, म्हणजे ५ ते १२ दिवस. मंकीपॉक्समध्ये संसर्ग झाल्यानंतर १-५ दिवसांच्या आत पुरळ उठतात. त्या सुरुवातीला चेहर्‍यावर दिसतात व नंतर इतर भागात पसरतात.

कांजिण्यासारखेच या रोगात फोड येतात; पण कालांतराने याच फोडाचे व्रण होतात. मंकीपॉक्सचा विषाणू कांजिण्यांना कारणीभूत असलेल्या विषाणूशी संबंधित असल्याने कांजिण्यांची लस लोकांना मंकीपॉक्स होण्यापासून वाचवू शकते. आफ्रिकेतील मागील डेटा सूचित करतो की, मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजिण्यांची लस किमान ८५ टक्के प्रभावी आहे. याशिवाय ज्यांना पूर्वी कांजिण्या झाल्या आहेत, त्यांच्यामध्ये मंकीपॉक्सचा धोकाही कमी असतो.

मंकीपॉक्समध्ये कांजिण्यांसारखी लक्षणे दिसतात, पण ती कमी गंभीर आहेत. सुरुवातीला या विषाणूमुळे ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, शरीरावर सूज, थंडी वाजून येणे अथवा थकवा जाणवू शकतो. यामध्ये कांजिण्यांसारखे पूरळ संपूर्ण शरीरावर येतात. सुरुवात बहुतांशी चेहर्‍यावरून होते. या पुरळांमध्ये सतत बदल होतात. शेवटी खपली तयार होण्यापूर्वी आणि ती खपली पडण्यापूर्वी हे वेगवेगळ्या टप्प्यांतून जाते. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात राहिल्याने हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतो. हा विषाणू फाटलेली त्वचा, श्‍वसनमार्ग, डोळे, नाक किंवा तोंडातून प्रवेश करू शकतो. एवढेच नाही तर व्हायरसने दूषित झालेल्या वस्तू जसे की अंथरुण आणि कपडे यांच्या संपर्कातूनही त्याचा प्रसार होतो.

मंकीपॉक्सवर उपचार काय?
सध्या या आजारावर कोणताही ठोस इलाज उपलब्ध नाही. परंतु हा आजार रोखण्यासाठी स्मॉल पॉक्स वॅक्सिन, अँटी व्हायरल यांचा वापर केला जाऊ शकतो. स्मॉल पॉक्स लस मंकीपॉक्स रोखण्यासाठी ८५ टक्के प्रभावी ठरली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
कोरोनाप्रमाणे हाही एक व्हायरल आजार आहे. म्हणजेच आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ही जनोपध्वंस व्याधी आहे. संक्रामक रोगांची कारणे सांगताना आयुर्वेदशास्त्रात म्हटले आहे की,
प्रसंगात् गात्रसंस्पर्शात् निःश्‍वासात सहभोजनात्‌|
एक शय्यासनाच्चापि वस्त्रमाल्यानुलैपनाम॥
जे रोग एका व्यक्तीकडून अथवा प्राण्याकडून दुसर्‍या व्यक्तीकडे जाऊन पोहोचतात त्यांना संक्रामक रोग असे म्हणतात. त्याची खालील कारणे आहेत-

  • रोगी व्यक्तीशी मैथून करणे. त्याच्या शरीराचा सतत स्पर्श होणे.
  • त्याच्या खोकल्यातून, श्‍वासातून, शिंकण्यातून चांगल्या प्राकृत मनुष्याचे प्राणवहस्रोतस दुष्ट होणे.
  • रुग्णाने वापरलेली भोजन इत्यादीसाठीची भांडी अथवा कपडे, अंथरुण, पांघरुण, टॉवेल यांचा चांगल्या माणसाने उपयोग करणे.
  • रुग्णाच्या शय्येत झोपणे.
    असे संक्रमण मनुष्येतर प्राण्यांकडून उदा. व्याधी झालेल्या शेळी, गाय, म्हैस यांचे दूध पिणे, रोगी प्राण्यांचे मांस भक्षण करणे, त्यांच्या मल, मूत्र यांचा स्पर्श होणे, दंश होणे यामुळेही होऊ शकते. म्हणून अशा व्हायरस रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाय योजावे/आचरणात आणावे.
  • असुरक्षित शरीरसंबंध टाळावे.
  • रुग्णाने वापरलेले अंथरुण, पांघरुण, टॉवेल वापरू नये.
  • खाद्यपदार्थ उष्टे खाऊ नये.
  • रुग्णांच्या बिछान्यात एकत्र झोपू नये.
  • कोरोनामध्ये जे नियम सांगितलेले आहेत- उदा. स्वच्छतेबाबत- त्यांचा पूर्ण अवलंब करावा. बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे, कोमट पाण्याने आंघोळ करणे इत्यादी.

संक्रामक व्याधी नियंत्रणासाठी

  • जनसामान्यांपर्यंत माहिती पोचवणे. जनजागृती महत्त्वाची आहे.
  • रुग्णाला इतर लोकांपासून दूर ठेवणे.
  • रुग्णाने प्रवास टाळावा.

काही घरगुती उपाय

  • तापासाठी पाण्याने भिजवलेल्या ओल्या फडक्याने संपूर्ण अंग पुसून काढावे.
  • आहारामध्ये शक्यतो द्रवाहार, उदा. मुगाचे कढण, सूप, काड्यांचे सूप, भाताची पेज, लाह्यांचे पाणी, लापशी यांसारखे पदार्थ सेवन करावे.
  • नखे वाढलेली असतील तर कापावी.
  • आंघोळीचे पाणी गरम करताना त्यात कडुनिम्बाची पाने टाकावीत. कडुनिम्बसिद्ध पाण्याने आंघोळ करावी.
    आयुर्वेदशास्त्रामध्ये मंकीपॉक्स या आजाराचा जरी उल्लेख नसला तरी ही जंतुसंसर्गजन्य व्याधी आहे. आयुर्वेदशास्त्र हे सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारे असल्याने जंतुसंसर्गजन्य आजारांचे उपाय सांगितले आहेत. वैद्याच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत. रुग्णाचे वय, वजन, प्रकृती, दोषप्राबल्य, बल, आजाराची अवस्था, निदान यानुसार औषध व त्याची मात्रा पूर्णपणे बदलते म्हणून नेहमी वैद्याच्या सल्ल्यानेच उपाययोजना करावी. यांसारख्या आजारावर पंचतिक्त कषाय, महासुदर्शन काढा, चंदनासव, अमृतारिष्ट, द्राक्षारिष्ट, मृत्युंजयरस, कुमारकल्याणरस, कामदुधारस, नारदेय लक्ष्मीविलास रस, संशमनी वटी इत्यादी औषधे वापरू शकता.
    दशांग लेपासारखा लेप तुपात कालवून त्याचा सर्वांगावर करावा. यामुळे खाज व डाग कमी होण्यास मदत होते. गरम, काढ्यासारखे उखळलेले पाणीही औषधाप्रमाणे काम करते.

पथ्य-अपथ्य

  • आहारात पचण्यास हलक्या पदार्थांचा समावेश करावा.
  • आहारात दूध, तूप, ताक, लोणी यांचा समावेश करावा. ताजे अन्नपदार्थ खावेत.
  • हिरव्या पालेभाज्या चांगल्या धुवून, शिजवून खाव्या.
  • मटणाचा सूप घेण्यास मांसाहारी लोकांना हरकत नाही.
  • विरुद्धाहार टाळावा.
  • मासे खाणे टाळा.
  • डाळिंब, आवळा, लिंबू, ताक यांसारखे पदार्थ खावेत.
  • अति तिखट, तेलकट, चमचमीत पदार्थ टाळावेत.
  • बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये.
  • दही, बेकरी उत्पादने, फास्ट फूड, जंक फूड्‌स टाळावेत.
    घाबरून न जाता प्रतिबंधक उपायांचा अवलंब करावा. चांगला सात्त्विक संतुलित आहार सेवन करावा. आपल्या शक्तीनुसार व्यायाम करावा. यम-नियम-आसनादी अष्टांग योगाचे आचरण करावे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आचरण केल्यास ‘मंकीपॉक्स’ची भीती वाटणार नाही.