>> मुख्यमंत्र्यांची ग्वाही; आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनाचे उद्घाटन
गोव्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि संजीवनी साखर कारखान्याला पुन्हा चालना देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या ८० व्या वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलताना काल दिली.
गोव्यातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखाना मागील दोन वर्षे बंद आहे. या साखर कारखान्याच्या कामाला पुन्हा चालना देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात अनेक साखर कारखाने आहेत. रिनिव्हेबल एनर्जी निर्मितीमध्ये साखर कारखान्यांचे योगदान असून, १० टक्के इथेनॉलच्या निर्मिती केली जात आहे. साखर उद्योगात नवीन तंत्रज्ञान, संशोधनावर भर दिला जात आहे. भारतामध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याची क्षमता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची उपस्थिती होती. त्यांनी साखर उद्योगातील तरुणांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीचे कौतुक केले. भारत खरोखरच स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे, असेही साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले.
यावेळी हेवी इंजिनिअरिंग लिमिटेडचे अध्यक्ष राजीव पुरी, शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, एनएसआयचे संचालक नरेंद्र मोहन, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, गोवा अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर आदींची उपस्थिती होती.