‘मोपा’ नंतरही दाबोळी विमानतळ सुरूच राहणार

0
23

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; दाबोळीच्या विस्तारावर ८५० कोटींचा खर्च

येत्या १५ ऑगस्टपासून मोपा विमानतळ सुरू झाला तरी दाबोळी विमानतळ चालूच राहणार आहे. त्यामुळे कुणीही त्याबाबत चिंता करू नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले. सरकारने ८५० कोटी रुपये खर्चून दाबोळी विमानतळाचा विस्तार केला असल्याचेही ते म्हणाले.
काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार संकल्प आमोणकर, डिलायला लोबो व केदार नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

पुढील काळात गोव्यात वर्षाला १ कोटी ६० लाख एवढे पर्यटक येतील. त्यामुळे मोपा विमानतळाबरोबरच दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळही नागरी विमान वाहतुकीसाठी खुला राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यानंतरही प्रश्‍न उपस्थित करताना आमोणकर यांनी एकदा मोपा विमानतळ सुरू झाला की दाबोळी विमानतळ हा नागरी विमान वाहतुकीसाठी खुला ठेवणे शक्य होणार नाही आणि तसे झाल्यास दक्षिण गोव्यातील टॅक्सीचालकांसह विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे आमोणकर यांनी निदर्शनास आणून दिले. मोपा विमानतळापासून काणकोण तालुका हा तर १०० किमी.च्या अंतरावर असल्याचेही त्यांनी नजरेस आणून दिले. दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांवर उपासमारीची पाळी येईल, असेही ते म्हणाले.

नवे विमानतळ सुरू झाल्यानंतर कित्येक राज्यातील जुने विमानतळ हे ङ्गघोस्ट एअरपोर्टफ बनले असून, ज्या प्रकारे हे विमानतळ बंद पडले आहेत, त्याच प्रमारे दाबोळी विमानतळ बंद पडण्याची भीती युरी आलेमाव यांनी व्यक्त केली. बंगळुरू, हैदराबाद या देशातील कित्येक भागात अशा प्रकारे विमानतळ बंद पडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कोट्यवधी रुपये खर्चून दाबोळी विमानतळाचा विस्तार केलेला असून, हा विमानतळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. गोव्यात सध्या १८ देशांतून चार्टर विमाने येतात. आता आणखी काही देशांकडून त्यासाठी विचारणा होऊ लागली आहे. कित्येक देशांना गोव्यात आपली चार्टर विमाने पाठवायची आहेत. भविष्यात वर्षाला १ कोटी ६० लाख पर्यटक राज्यात येणार असल्याने दोन्ही विमानतळ चालू राहतील. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तेथे ८० लाख प्रवासी येतील, तर दाबोळी विमानतळावरून १ कोटी १० लाख एवढे प्रवासी येतील, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.