- – शंभू भाऊ बांदेकर
माझा ‘उन्नयन’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतरही माझ्या कविता लिहिण्यात, लेख लिहिण्यात खंड पडला नव्हता; पण सक्रिय राजकारणात असल्यामुळे लेखनाचे सातत्य मात्र राहिले नव्हते. शिवाय माझा संसारही वाढला होता…
माझा ‘उन्नयन’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतरही माझ्या कविता लिहिण्यात, लेख लिहिण्यात खंड पडला नव्हता; पण सक्रिय राजकारणात असल्यामुळे लेखनाचे सातत्य मात्र राहिले नव्हते. शिवाय माझा संसारही वाढला होता. कु. शिल्पा, चि. भूपेश या दोन मुलांनंतर कु. दीपाचा जन्म झाला होता. तिचा जन्म २३ जानेवारी १९८२ चा. १९८७ नंतर माझे राहणे आल्तिनो- पणजी येथील शासकीय निवासस्थानी होते (भाऊसाहेब बांदोडकरांच्या बंगल्याशेजारी). तरी माझी तिन्ही मुले साळगावच्या लुईस कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये शिकत होती. गाडी असल्यामुळे मुलांना नेण्या-आणण्याची सोय होती.
गोव्यातील दैनिकांच्या रविवार पुरवणीत माझ्या कविता छापून येत होत्या. यावेळी श्री. नरेंद्र बोडके यांनी आपल्याला ‘बुलंद’ साप्ताहिकाला वाहून घेतले होते व त्यांचे वास्तव्य आता गोव्यातच होते. त्यांनी माझा पिच्छा पुरवून व चित्रकार कविमित्र गोविंद नाईक यांनी मुखपृष्ठाची तयारी करून माझा ‘आत्मशोध’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यास सहकार्य केले. १९९३ च्या जानेवारीत हा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचा योग आला. हा कवितासंग्रह मी माझे कोल्हापूरस्थित मित्र रत्नाकर तात्यासाहेब ऊर्फ आर. टी. जोशी यांना अर्पण केला आहे. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. या संग्रहास प्रख्यात साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. डॉ. पानतावणे यांनी म्हटले होते की, ‘‘शंभू भाऊंचा अनुभव म्हणजे आत्मकहाणी आहे. आपण जे जगतो, आपण जे अनुभवतो, आपणास जो प्रत्यय येतो त्याचा तो सहजाविष्कार आहे. म्हणूनच हा अनुभव सहजतेनंच कवितेचं रूप धारण करतो. त्यास कलात्मकतेचा ऊरबडवा सोस नाही. आपल्याला जे जाणवले ते स्वाभाविकतेने कवितेत मांडावे हा कवीचा ध्यास आहे. आणि म्हणूनच ‘आत्मशोध’मधील कविता फारशी प्रतिमांच्या पाशात अडकून पडत नाही की कल्पनांच्या अतिरेकी तोकाझोकात स्वतःला गुंतवून घेत नाही. आपला अनुभव मांडत जाणे हाच शंभू भाऊंच्या कवितेचा स्वभाव आहे.’’
दलिताची डायरी
‘दलिताची डायरी’ हे माझे पाचवे पुस्तक तब्बल सात वर्षांनी प्रसिद्ध झाले. तसा समाजकारण, राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये मी सक्रिय असूनही माझे चौफेर लिखाण चालूच होते. फावल्या वेळेत मित्रांशी गप्पांची मैफल रंगत असे व हास्यविनोदांनाही उधाण येत असे. एकदा अशाच एका प्रसंगी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये झालेला विनोदी किस्सा मी सांगितला. तो असा-
शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात ः सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यात काय साम्य आहे? त्यावर एक विद्यार्थी उत्तरतो, ‘सर ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि परीक्षा झाल्यावर विद्यार्थी यांचे उत्तर एकच असते…’ त्यावर शिक्षक कुतूहलाने विचारतात, ‘ते कसे काय?’ त्यावर विद्यार्थी म्हणतो, ‘दोघेही म्हणतात, आम्ही आमच्यापरीने भरपूर प्रयत्न केले, पण रिझल्ट आताच काही सांगू शकत नाही.’ त्यावर मित्रमंडळी हास्यकल्लोळात रममाण झाली व मग माझ्या पोतडीतील आणखी चार-पाच विनोद मी सांगून त्यांना मनमुराद हसवले. त्यातून मग या मित्रांनी मला अशा विनोदांचं संकलन करून एखादं पुस्तक छापण्याची सूचना केली व कालांतराने ‘तुम्हाला हसावंच लागेल’ हे पुस्तक मी प्रकाशित केले. असो.
तर दलिताच्या डायरीबद्दल सांगायचे म्हणजे १९९० च्या दरम्यान दलितांवर झालेल्या अन्यायाच्या संदर्भातील एक लेख घेऊन मी एका वर्तमानपत्राच्या पणजी येथील कार्यालयात गेलो. तेथील महोदयांनी लेख फारच छान आहे म्हणत दोन दिवसांत छापतो असे सांगितले. आमच्या गप्पा मग गोवा, महाराष्ट्र आणि भारतात चाललेल्या दलितांवरील जुलूम, जबरदस्ती, अत्याचार, बलात्कार, खून यांच्यावर येऊन ठेपल्या. मी त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद उत्तर दिले. त्यावर ते म्हणाले, ‘अहो, हे सारे लोकांपर्यंत पोचले पाहिजे. तुम्ही असे करा, पुढच्या आठवड्यापासून एक सदर आमच्याकडे सुरू करा!’ मी विशेष आढेवेढे न घेता संमती दर्शवली व आठवड्याला एक लेख असे सतत दीड-दोन वर्षे ते चालू ठेवले. त्यातील निवडक लेख म्हणजेच ही ‘दलिताची डायरी’ होय.
पूर्वी अशाच प्रकारचे माझे अनेक लेख दै. ‘नवप्रभा’मधून छापून आले होते व त्यासाठी संपादक सुरेश वाळवे यांनी मला लिहिते ठेवले होते. म्हणून या पुस्तकास प्रस्तावना लिहिण्याची विनंती मी श्री. वाळवे यांना केली व त्यांनी ती मान्यही केली. दोन दिवसांनी ‘वाटचालीचे रूपांतर आता घोडदौडीत होवो’ अशा शुभेच्छा देत त्यांनी म्हटले- ‘दलिताच्या डायरीत काय नाही? अनेक विषयांना ती स्पर्श करते. दलितोद्धार हा शंभू भाऊंचा ध्यास आहे अन् जोवर जातिनिरपेक्ष समाजनिर्मिती होत नाही तोवर भारतात खर्या अर्थाने ‘सर्वधर्मसमभाव’ जोपासला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून ‘जात जाऊ द्या मरणालागुनी’ असे ते पोटतिडकीने म्हणतात अन् त्याचबरोबर मंडळ आयोगाच्या शिफारशींचे स्वागत करताना अन्य मागासवर्गीयांच्या पाठीशी राहतात. शैक्षणिक संस्था वा शासकीय नोकर्यांमध्ये दलितांना आरक्षण ही मेहेरबानी नसून शेकडो वर्षे सवर्णांनी त्यांच्यावर जो अन्याय केला त्याचे राखीवता हे किंचित परिमार्जन असल्याचे शंभू भाऊंचे मत आहे.’
या ‘डायरी’ला उत्कृष्ट मुखपृष्ठाने सजवण्याचे काम माझे चित्रकार मित्र संजय हरमलकर यांनी केले. ही ‘दलितांची डायरी’ मी लोकनेते, दलितमित्र अण्णा ऊर्फ हरिष झांट्ये यांना अर्पण करताना म्हटले होते- ‘ज्यांनी मला समाजकारणात आणि राजकारणात सदैव सहकार्याचा आणि सौहार्दाचा हात दिला त्या माननीय अण्णा ऊर्फ हरिष झांट्ये यांस हे पुस्तक सविनय अर्पण.’
येथे मी फक्त माझ्या पाचच पुस्तकांबद्दल लिहिले आहे; पण माझी संकलित, संपादित, वैचारिक, ललित, थोरामोठ्यांच्या कर्तृत्वगाथांवर आधारीत पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत व अजूनही तीन-चार पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याचे कारण म्हणजे, सुप्रसिद्ध कवी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कविता मला लिहिते करत असतात. हा कवी म्हणतो ः
ढहश ुेेवी रीश र्श्रेींशश्रू,
वरीज्ञ रपव वशशि. र्इीीं ख
हर्रींश िीेाळीशी ींे ज्ञशशि,
रपव ाळश्रशी ींे से लशषेीश ख
- अर्थात, वनराई खूप सुंदर आहे, शांत आहे, आल्हाददायक आहे. पण मी कुणालातरी शब्द दिला आहे. मला ध्येय गाठायचे आहे, त्यावेळी कोणताही आराम नाही.
मीही शब्द दिला आहे माझ्या वाचनावर प्रेम करणार्या वाचकांना, मला लिहिण्यास प्रवृत्त करणार्या माझ्या मित्रांना आणि वृत्तपत्रांचे संपादक ते चाहत्यांना.
यात आणखी एका इंग्रजी वाक्याने मला लिहिते ठेवण्याचे काम केले आहे. ते वाक्य आहे- ‘खष ुश ीशीीं, ुश र्ीीीीं’ म्हणजे आपण थांबलो, आराम करायला लागलो की गंज चढतो. असा गंज चढू नये म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळी मिळेल तेव्हा लिहीत असतो आणि लिहीत राहणार आहे.
माझे सद्भाग्य असे की, माझ्या या पुस्तकांना आशीर्वाद, शुभेच्छा देणार्या प्रस्तावना प्राचार्य गोपालराव मयेकर, प्राचार्य सुरेंद्र सिरसाट, प्रा. डॉ. सोमनाथ कोमरपत यांनी लिहिल्या. पत्रकारितेतील ज्येष्ठ-श्रेष्ठ-शब्दप्रभूंचे शब्द माझ्या लिहित्या हातांना बळकट करीत गेले आहेत. या सर्वांप्रती विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे परम कर्तव्य समजतो.