राज्यात या जुलै महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत कोरोनाने पाचजणांचा बळी घेतला असून गेल्या चोवीस तासांत नवीन १०८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. काल आणखी २ कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सक्रिय रुग्णसंख्या ८४५ एवढी झाली असून राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे सरासरी प्रमाण १२.०२ टक्के एवढे बनले आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ८९८ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. चोवीस तासांत आणखी ७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे आहे.
राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आतापर्यंत पाच कोरोना बळींची नोंद झाली आहे, तर, २३ कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून १२१० बाधित आढळून आले आहेत. बाधित रुग्ण आढळून येण्याचे या महिन्याचे सरासरी प्रमाण १०.९१ टक्के एवढे आहे.
राज्यात जून महिन्यापासून कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. जून महिन्यात ६ कोरोना बळींची नोंद झाली आहे, तसेच नवीन २९१७ बाधित आढळून आले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८४३ एवढी आहे.
राज्यात नवीन कोरोना बाधिताची संख्या वाढत असली तरी बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. दहा दिवसात आतापर्यंत १३८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.