>> कुशावती नदीला पूर; डिचोलीत घरांची पडझड; २४ तासांत तब्बल ६ इंच पावसाची नोंद; पावसाचा जोर ९ जुलैपर्यंत कायम राहणार
सलग दुसर्या दिवशी राज्यभरात मुसळधार पाऊस बरसल्याने जनजीवनावर परिणाम झाला. पावसाच्या तडाख्यात डिचोली तालुक्यात दोन घरे कोसळली, तर कुशावती नदीला पूर आल्यामुळे पारोडा येथील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. परिणामी केपे-मडगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. केपे येथे पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाणार्या एका तरुणाला वाचवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना काल यश आले. काही ठिकाणी झाडे व दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या. पावसाचा हा जोर ९ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याने सतर्कता बाळगावी लागणार आहे. दरम्यान, मागील २४ तासांत ६ इंच पाऊस पडला.
हवामान खात्याकडून ४ जुलैपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी पावसाने राज्याला झोडपून काढले. पावसाचा हा धडाका मंगळवारी देखील कायम राहिला.
डिचोली तालुक्यात पावसाच्या तडाख्यात दोन घरे कोसळली. त्यात जवळपास अडीच लाखांची हानी झाली. नार्वे येथील वासंती चोडणकर या महिलेचे मातीचे घर पूर्णपणे कोसळून दोन लाखांची हानी झाली, तर दुसर्या एका घटनेत वेळगेतील लीला वेळगेकर यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाले.
डिचोली तालुक्यात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूरसदृश्य स्थिती दिसून आली. तसेच तालुक्यातील दहाहून अधिक खनिज खंदकात प्रचंड पाणी साठले असून, खंदकांत अतिरिक्त पाणी साठू नये, यासाठी नियमित पंपिंग सुरू आहे. जोरदार पावसामुळे लामगाव, शिरगाव, पैरा, साखळी, शिरसई, वेळगे, पाळी, कुडणे, पिसुर्ले या ठिकाणच्या खाणी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. सत्तरी तालुक्याच्या विविध भागांतही काल दिवसभर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे म्हादई आणि रगाडा नदीची पाणी पातळी वाढली. काल सकाळी कणकिरे-सत्तरी येथे क्रशरजवळ गांजे बंधार्यालगत रस्त्यावर झाड पडल्याने वाळपई-फोंडा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता.
ओर्डा-कांदोळी येथे दत्त मंदिराजवळ एका कारवर झाड कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. यावेळी कारमधील चालकाला स्थानिकांनी सुखरुप बाहेर काढले. कोने-प्रियोळ येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे फोंडा-पणजी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी दरड हटवली. दावकोण-धारबांदोडा येथे मुसळधार पावसामुळे दूधसागर नदीला पूर आला आहे. या ठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. खारेबांध-मडगाव येथील तळे पूर्णपणे भरल्याने पुराचा धोका निर्माण झाला. बगल मार्गाच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
राज्यभरात अनेक ठिकाणी झाडांच्या पडझडीच्याही घटना घडल्या. करासवाडा-म्हापसा येथे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या शेडवर झाड कोसळून नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ते झाड हटवले. तसेच सोमवारी रात्री उशिरा सावर्डे येथे रेल्वे रुळावर भलेमोठे झाड कोसळले. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. वास्को-कुळे ही रेल्वे काही वेळ थांबवण्यात आली. त्यानंतर सदर झाड हटवत रेल्वेला मार्ग मोकळा करून देण्यात आला.
केपे-मडगाव वाहतूक ठप्प
गेले दोन दिवस सातत्याने केपे तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल कुशावती नदीला पूर आला. त्यामुळे पारोडा येथील मुख्य रस्ता पाण्याखाली जाऊन केपे ते मडगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक चांदर तसेच कुंकळी मार्गे वळवण्यात आली.
केपे येथे बुडणार्या तरुणाला वाचवले
केपे येथे पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाणार्या एका तरुणाला कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले. काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील चौहान (३०) हा तरुण पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुशावती नदीत वाहून जात होता. त्याने बचावासाठी एका झाडाच्या फांदीचा आधार घेतला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य राबवले.
पाऊस इंचाच्या अर्धशतकाजवळ
धो-धो कोसळणारा पाऊस गोव्यात आपले अर्धशतक पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या १ जून ते ५ जुलैपर्यंत राज्यात कोसळलेल्या पावसाने इंचांचे अर्धशतक गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून, आतापर्यंत ४७.३६ इंच एवढा पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पावसापेक्षा यंदाचा पाऊस सरासरी १३ टक्के एवढा जास्त आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात कोसळलेल्या सरासरी पावसाचे प्रमाण हे १५६ मिमी. एवढे असून, गेल्या ५ वर्षांत एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
राज्य हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ जुलै २०१३ रोजी राज्यात १६३ मिमी., ६ जून २००९ रोजी २११ मिमी., २५ जुलै २००५ रोजी, २२५ मिमी., २४ जुलै १९९८ रोजी २८७ मिमी., १५ जून १९९६ रोजी २९२ मिमी. एवढ्या पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत राज्यात झालेल्या पावसापेक्षा जास्त पाऊस झाल्याची कैक उदाहरणे असावीत; मात्र गेल्या २४ तासांत कोसळलेला पाऊस हा गेल्या ५ वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.