तुम्ही वातावरण बिघडवले; माफी मागा

0
20

>> सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना काल सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये फटकारले. नुपूर शर्मा तुम्ही देशातील वातावरण बिघडवले, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले. इतकेच नाही तर न्यायालयाने त्यांना टीव्हीवर जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे.

तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे फक्त देशातील वातावरण बिघडले नाही, तर त्यामुळे देशाची बदनामी देखील झाली. याचबरोबर न्यायालयाने शर्मा यांची याचिका देखील फेटाळून लावली आणि त्यांना या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले. नुपूर शर्मा यांच्याविरोधात वेगवेगळ्या राज्यांत याचिका दाखल आहेत. त्या सर्व याचिका दिल्लीत वर्ग करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती; पण त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. शर्मा यांनी याआधी मागितलेल्या माफीवर देखील न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.