>> हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे प्रतिपादन; दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
जेव्हा आम्ही उमेदवारांना कोणत्याही कामासाठी नियुक्त करतो, तेव्हा त्यांच्याकडे त्यांचा अनुभव आणि पात्रता विचारतो; मात्र आमदारांकडे आवश्यक प्रशिक्षण आहे का, असे कोणीही विचारत नाही. विधानसभेचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालावे, यासाठी आमदारांनाही प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तथा गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी केले. आमदाराचे खरे काम कायदे बनविणे आणि चांगले कायदे करणे हे असते. त्यामुळे त्यांनी विधानसभेत अवलंबिलेल्या कार्यपद्धतींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
गोवा विधानमंडळ सचिवालय आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीत गोव्यातील आमदारांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, विधीमंडळ मंत्री नीलेश काब्राल, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे व आमदार उपस्थित होते.
एखादा आमदार जेव्हा सभागृहात असतो, तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्या विधानसभेतील कामगिरीकडे असले पाहिजे. आमदारांना सभागृहाच्या कार्यपद्धतीविषयी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. विधानसभा हे लोकशाहीचे मंदिर असेल तर आपण त्याप्रमाणे वागले पाहिजे. आमदारांनी विधानसभेचा वेळ वाया घालवू नये, असेही आर्लेकर म्हणाले.
केवळ काही लोकच सभागृहाच्या कामकाजाचे नियम आणि कार्यपद्धती वाचतात. एखाद्या आमदाराला यशस्वी व्हायचे असेल, तर हे कार्यपद्धतीचे पुस्तक पवित्र ग्रंथासारखे आहे कारण आमदारांचा स्वभाव तो सभागृहात कसा वागतो यावरच ठरतोहे प्रशिक्षण केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधकांच्या फायद्यासाठी आहे. सत्ताधारी चुका करतात, तेव्हा त्या दुरुस्त करण्यासाठी विरोधकांच्या भूमिकेची खूप आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपचा शिबिरावर बहिष्कार
गोवा विधिमंडळ सचिवालयाने आमदारांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेवर ‘आप’च्या आमदारांनी बहिष्कार टाकला. हे प्रशिक्षण शिबिर घेण्यास समक्ष असे अधिकारी विधिमंडळ खात्यात असताना सदर प्रशिक्षणाची जबाबदारी सरकारने भलत्याच लोकांकडे सोपवली. त्यामुळे आपने या शिबिरावर बहिष्कार टाकल्याचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.