वर्षभरानंतरही पूरग्रस्त निवार्‍यापासून वंचित

0
13

>> गेल्या वर्षीच्या २३ जुलैच्या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त; सरकारसह लोकप्रतिनिधींचे मदतीकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षी २३ जुलै रोजी राज्यात आलेल्या महापुरामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता आणि त्यात शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महापुराची सर्वाधिक झळ सत्तरी तालुक्याला बसली होती. या पुरामुळे शेती-बागायतींचे नुकसान तर झालेच शिवाय अनेकांची घरे देखील जमीनदोस्त झाली. मात्र आता या महापुराला वर्ष पूर्ण होत आले तरी पूरग्रस्तांना हक्काचा निवारा मिळू शकलेला नाही. त्यामुळे यंदाच्या पावसातही त्यांना झोपडीत मुक्काम करावा लागणार आहे.

या महापुरात सत्तरी तालुक्यातील साडेचारशे घरांना फटका बसला होता. ज्यांची घरे जमीनदोस्त झाली होती, त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये सोडल्यास सरकारकडून अजूनही फक्त आश्वासनेच मिळत आहे; पण मदत मात्र फक्त कागदावरच आहे. १ लाखांच्या तुटपुंज्या मदतीवर पुन्हा घर उभारणे आताच्या महागाईत शक्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर अधिक मदत द्यावी, अशी मागणी पूरग्रस्तांकडून होत आहे.

सत्तरीच्या इतिहासात एवढा महापूर पहिल्यांदाच आला. आणि तो सत्तरी व उसगाव येथील सुमारे साडेचारशे कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करून गेला. महापूर येऊन एक वर्ष होत आले; पण सरकारने भरीव मदत अद्याप मिळालेली नाही.

अजूनही पूरग्रस्तांची घर उभारणीसाठी धडपड सुरू असल्याचे पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यास दिसून येते. आंबेडे-नगरगाव येथील ज्ञानेश्वर च्यारी कुटुंबाची व्यथा सुध्दा तशीच आहे. या कुटुंबाला गेल्या वर्षी महापुराची झळ बसली. त्यामुळे त्यांचे घर जमीनदोस्त झाले आणि संसार उघड्यावर पडला. या पुराला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार असून, अजूनही त्या कुटुंबाला कोणीही मदतीचा हात पुढे केलेला नाही. त्यांच्याकडे सरकारबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले.

पंचायत, आमदारांचे दुर्लक्ष
च्यारी कुटुंबीयांनी पंचायत तसेच स्थानिक आमदार विश्‍वजीत राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. त्यावेळी राणेंनी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले; पण आजपर्यंत ते पूर्ण ़झाले नाही. आता पुन्हा पावसाळा सुरू झाल्याने च्यारी कुटुंबाला झोपडीतच दिवस काढावे लागणार आहे. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून, त्या कुटुंबाला जगणेही कठीण होऊन बसले आहे.