जीटीडीसीच्या चार इमारतींची पुनर्बांधणी करणार : गावकर

0
35

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत म्हापसा, मोले, वास्को आणि कोलवा येथील जुनाट झालेल्या रेसिडन्सी इमारतींच्या जागी नव्या इमारती उभारण्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पर्यटन विकास महामंडळाच्या चार ठिकाणच्या रेसिडन्सी जुनाट झालेल्या आहे. तसेच पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी चार ठिकाणच्या रेसिडन्सीच्या इमारती जमीनदोस्त करून नव्याने बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही गावकर यांनी सांगितले.

राज्यात सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तांबडी सुर्ला येथे आंतरराष्ट्रीय शिव महोत्सवाच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली आहे. दोनापावल येथील जेटी पर्यटकांसाठी लवकरच खुली करण्यात येणार आहे. दोनापावल जेटीच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराला स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, असेही गावकर यांनी सांगितले.