- – विद्या सतरकर
आणि अचानक समोरून अंधारून आले. गार वारा वाहू लागला. सर्वांच्या चेहर्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले… आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. पहिला पाऊस असतो सगळ्यांना आपलंसं करणारा. आनंद देणारा. आठवणी ताज्या करणारा. एक वेगळी ऊर्जा आणणारा. सगळेजण वाट बघत असतात या पहिल्या पावसाची. सर्वात जास्त आनंदी तर माझा शेतकरीराजा होतो. कारण तो पूर्ण वर्ष त्याचीच वाट बघत असतो!
पाऊस किती लहरी… जून महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय… पावसाची चिन्हेसुद्धा दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक हैराण झाले होते. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे टक लावून बसला होता.
आणि अचानक समोरून अंधारून आले. गार वारा वाहू लागला. सर्वांच्या चेहर्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले… आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. पहिला पाऊस असतो सगळ्यांना आपलंसं करणारा. आनंद देणारा. आठवणी ताज्या करणारा. एक वेगळी ऊर्जा आणणारा. सगळेजण वाट बघत असतात या पहिल्या पावसाची. सर्वात जास्त आनंदी तर माझा शेतकरीराजा होतो. कारण तो पूर्ण वर्ष त्याचीच वाट बघत असतो!
पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या की मन कसे प्रसन्न होऊन जाते. मातीचा गंध सर्वत्र पसरतो आणि सगळेकडे चैतन्याचे वारे वाहू लागतात. उन्हाळ्यातील गरमी सरून आल्हाददायक वातावरण होते. आणि यातच शेतकरी आपल्या तयारीला लागतो.
या वर्षी पाऊस थोडा लपंडाव खेळला. मान्सूनच्या आधीच अधे-मधे आपली उपस्थिती लावून गेला. पण मान्सून वेळेत आल्याचे संकेत मिळाले आणि त्यामुळे शेतकरी वर्गासाठी आशादायक वातावरण निर्माण झाले.
गोव्यात भातशेती हे प्रमुख पीक आहे. पावसाच्या आगमनाच्या आधी शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करून तयार असतात. कृषी खात्याकडून मिळणार्या सामग्रीद्वारे व अन्य पारंपरिक पद्धतीने नांगरणी केली जाते. प्रत्येक पीक घेण्यासाठी चांगली नांगरणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे बियाण्यांची उगवण व पिकांची वाढ, त्याचबरोबर तणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच पाणी जमिनीत चांगल्या प्रकारे मुरते. पावसाच्या रूपाने मिळणारे पाणी शेतीसाठी एक वरदानच आहे.
गोव्यात ‘मरड’ भागात किंवा माळरानावर जमिनीची आवश्यक ती मशागत करून भाजीपाला, भात, नाचणी अशी पिके मोठ्या प्रमाणात पूर्वी पाहायला मिळत होती. डोंगरउतारावर लहान पाट बांधून खाचरे तयार केली जात. या खाचरांमध्ये भात, नाचणी, कुळीथ, उडीद यांसारखी पिके घेताना लोकं दिसत होती.
काणकोण, केपे, सांगे, फोंडा, सत्तरी, पेडणे या भागांत अशी शेती करण्याची पद्धत अजूनही आपल्याला आढळते. आता फोंडा तालुक्यातील प्रियोळ, बांदोडा, बेतोडा, बोरी व अन्य काही भागांत काकडी, दोडकी, कारली यांचे मळे उभे असलेले पाहायला मिळतात. त्यांना येथे ‘मोळेकार’ असे म्हटले जाते. वेलवर्गीय भाज्यांचे मळे फुलताना त्यांसोबतच आपल्याला भेंडी, वांगी, वाल, मुळा, मिरची अशी वेगवेगळी पिकेही पाहायला मिळतात. आपण जर आता अंत्रुज महालात फेरफटका मारला तर आपल्याला गोव्याच्या प्रसिद्ध काकडीचा चांगला आस्वाद घेता येईल.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनुसार गोव्यात ४१,९७० हेक्टर जमिनीत भातशेती केली जाते. भाताला सरकारकडून मिळणार्या आधारभूत किमतीमुळे शेतकर्यांचा भात उत्पादनाकडे कल वाढलेला दिसून येतो. गेल्या काही वर्षांत भाताच्या उत्पादन वाढीसाठी कृषी संचालनालय व अन्य काही संस्थांनी एसआरआय पद्धतीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या गोव्यात भाताच्या २८ पारंपरिक जाती संशोधकांनी शोधून काढल्या आहेत. पण आज आपण पाहिले तर या जाती नामशेष होताना दिसत आहेत. आज गोव्यात जास्त करून जया, ज्योती, काही प्रमाणात कर्जत, आजगो या जातींना शेतकरी प्राधान्य देताना दिसतात. ‘आयसीएआर’ संस्थेने शोधून काढलेले वाण म्हणजे गोवा धन- १, २, ३, ४ यांची पण लागवण करणे सुरू आहे. कृषी खाते गोवा धन- ३ ची बियाणीही उपलब्ध करून देत आहे. ही जात खार्या पाण्यात उगवते व चांगले पीक देते. आज भातशेती करणे सोपे झाले आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे जी समस्या निर्माण झाली होती त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची थोडीफार का होईना मदत झाली आहे. लागवडीसाठी भात लागवड यंत्र आले. कापणीसाठी यांत्रिक कापणी यंत्र आले. यामुळे परत एकदा पडीक जमिनी भातशेतीकडे येताना पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यापूर्वीच बागायती पिकांच्या लागवडीचीही तयारी सुरू होते. नारळ, केळी, आंबा, काजू पिकांच्या लागवडीसाठी खड्डे मारण्याची कामे पावसाळ्यापूर्वी उरकण्याचा शेतकर्यांचा प्रयत्न असतो. आणि पावसाळा सुरू झाला की बर्याच ठिकाणी रोपे, कलमे मिळवण्यासाठी लगबग सुरू होते. पावसात जेवढ्या लवकर नवीन लागवड केली जाईल तेवढा जास्त पावसाचा कालावधी नवीन लागवडीला उपलब्ध होतो आणि लावलेली रोपे स्थिरस्थावर होऊन त्यांची वाढ चांगली होते. राज्यात आंब्याच्या बागा तशा खूप कमी प्रमाणात सापडतात. पण आंब्याच्या विविध जाती बर्याच प्रमाणात प्रसिद्ध आहेत. त्याचमुळे नवीन लागवडीसाठी इच्छुक असणार्यांनी याचाही विचार केला पाहिजे.
अननस हेही गोवा राज्यात एक महत्त्वाचे पीक आहे. पण मागच्या काही वर्षांमध्ये त्याची उत्पादकता बरीच कमी झालेली दिसते. पणजी-फोंडा मार्गाच्या बाजूला कुंकळ्ळी, प्रियोळ या भागांत पारंपरिकरीत्या दिसणारे अननसांचे ढीग आता एवढे दिसत नाहीत. माती आणि जल संधारणासाठी अननसाची लागवड फार उपयुक्त आहे.
पावसाळी भाजीपाला लागवडीतही गोव्यात लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसत आहे. शेजारच्या राज्यांवर पूर्णपणे अवलंबून असणारा गोवा भाज्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे. विक्रीयोग्य उत्पादन घेण्यासाठी राज्य शासनाच्या फलोत्पादन महामंडळाने माल खरेदी करण्याची तरतूद केल्यामुळे शेतकरी जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि त्याचमुळे बरेच शेतकरी शेतीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. गोव्यात शेतीकडे पाहण्याचा शेतकर्यांचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. आज संमिश्र शेतीचा बोलबाला आहे. आपल्याकडे जर मुबलक जमीन असेल तर मिश्रशेती करणे जास्त फायदेशीर ठरते.
गोव्यातील कुळागरं हे संमिश्र शेतीचे चांगले उदाहरण आहे. सुपारीच्या बागांमध्ये केळी, पपई, जायफळ, मिरी, पानवेल यांची पारंपरिक लागवड केलेली आढळते.
गोव्यात एवढा पाऊस पडूनसुद्धा पाण्याचे नियोजन योग्यरीत्या न झाल्यामुळे आपण पावसानंतर पीक जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच गोव्यात पाणी व्यवस्थापन होणे खूप गरजेचे आहे. पावसाळी पाणी पुढील पिकासाठी साठवून ठेवणे महत्त्वाचे आहे. पावसाचे पाणी वाहू न देता ते जमिनीत जिरेल अशी व्यवस्था करणे आज काळाची गरज आहे. पाणी अडवणार्या संरचना निर्माण करणे व असलेल्या संरचना दुरुस्त करून पुढील पिकांसाठी पाणी साठवून ठेवता येणे शक्य आहे.
मेडिकल प्लांट बोर्ड कोकम, पिंपळी आणि स्टेव्हिया लावण्यासाठी सहायता देतात. त्यामुळे याही पर्यायांचा शेतकर्यांनी विचार केला पाहिजे. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बर्याचशा गोष्टी सोप्या होत आहेत. सरकारकडून शेतीसाठी अनुदान दिले जाते, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन पारंपरिक शेतीची आधुनिकतेशी सांगड घालत आज अनेक तरुण शेती व्यवसायात उतरताना दिसत आहेत. विविध नवीन प्रयोग करून यशस्वी होत आहेत, हे खरेच आशादायी चित्र आहे.
अजून गोवागोवी, खेडोपाडी फिरून जनजागृती करून (शेतीसंबंधी व सामायिक जमिनीसंबंधी), वेळ पडल्यास बैठका घेऊन, महिलांचा सहभाग वाढवून शेतीसंबंधी अडचणी दूर करून व मातीतील संभ्रम दूर करून जास्तीत जास्त जमिनी कशा लागवडीखाली आणता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे.