विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २५ दिवसांचे

0
27

>> ११ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत कामकाज चालणार

गोवा विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २५ दिवस चालणार आहे. या अधिवेशनाला ११ जुलै रोजी प्रारंभ होणार असून, ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वषात गोवा विधानसभेची अधिवेशने जास्त दिवस चालली नाहीत. महामारीमुळे अधिवेशने कमी दिवसातच आटोपती घ्यावी लागली. आता, गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, हे अधिवेशन २५ दिवस चालणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दुसर्‍या कार्यकाळातील हे दुसरे अधिवेशन आहे. डॉ. सावंत यांनी दुसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वार्षिक अर्थसंकल्प सादर केला होता. आता या अर्थसंकल्पावर आगामी पावसाळी अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे.

अधिवेशनासाठी ३ तारांकित आणि १५ अतारांकित प्रश्‍न आमदार विचारू शकतात. आमदारांना खात्यासंबंधी तारांकित व अतारांकित प्रश्‍न सादर करण्यासाठी वेळ मर्यादा दिली आहे. आमदार ऑनलाइन पद्धतीने प्रश्‍न पाठवू शकतात. तसेच, सूचना पेटीमधून प्रश्‍न दिले जाऊ शकतात. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून हे अधिवेशन चालेल.

राज्यातील समस्यांबाबत कॉंग्रेस आवाज उठवणार

>> अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आमदारांची विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक

गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी कॉंग्रेस आमदारांची एक बैठक पर्वरी येथील विधानसभा संकुलातील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या कार्यालयात काल घेण्यात आली. यावेळी आपापल्या मतदारसंघांसह राज्यातील समस्यांबाबत विधानसभेत आवाज उठवण्याविषयी विचारविनिमय झाला.

कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यात आलीे. आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील समस्यांबरोबरच राज्यातील समस्यांबाबत विधानसभेत प्रश्‍न विचारण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला, अशी माहिती मायकल लोबो यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
कॉंग्रेसच्या नवीन आमदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवीन आमदारांना विधानसभेत प्रश्‍न, उपप्रश्‍न विचारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवीन आमदारांना विधानसभा कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणखी एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे, असेही लोबो यांनी सांगितले.

आमदार होण्यापूर्वी हॉटेल बांधले : लोबो

नगरनियोजन खात्याने पाठविलेली कारणे दाखवा नोटीस अजून आपल्याला मिळालेली नाही. आपणाला नोटीस पाठविल्याचे माध्यमातून समजले आहे. नोटीस मिळाल्यानंतर तिला उत्तर दिले जाणार आहे. आपण आमदार होण्यापूर्वी २००७ मध्ये हॉटेल बांधलेले आहे, असे स्पष्टीकरण मायकल लोबो यांनी काल दिले.