>> केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; तीळासाठी सर्वाधिक ५२३ रुपये एमएसपी वाढ
केंद्र सरकारने भात पिकासह एकूण १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल हा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२-२३ हंगामासाठी भात पिकाचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवून २,०४० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे. तीळाच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक ५२३ रुपयांची वाढ झाली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकर्यांचे मनोबलही उंचावते आणि त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळतो. यावेळी सर्व १४ खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. किसान सन्मान निधी अंतर्गत दोन लाख कोटी रुपये खात्यात गेले आहेत. खतावर दोन लाख दहा हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
तूरडाळीचा एमएसपी ६६०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला असून, गतवर्षीपेक्षा यामध्ये ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तिळाच्या किमतीत प्रति क्विंटल ५२३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर मूगडाळ प्रति क्विंटल ४८० रुपयांनी वाढली आहे. सूर्यफूलच्या किमतीत ३५८ आणि भुईमूगाच्या किमतीत प्रति क्विंटल ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सरकारने इतरही अनेक पिकांना एमएसपीच्या कक्षेत आणले आहे. विम्यापासून सिंचनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण झाले आहे. पीक विविधतेला प्रोत्साहन देताना सरकारने एमएसपीच्या दरात ऐतिहासिक वाढ केली. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची विक्रीही वाढली, असेही अननुराग ठाकूर म्हणाले.