- – शंभू भाऊ बांदेकर
मला वाचनाची प्रथम आवड माझ्या थोरल्या बंधूने- मनोहरदादाने- लावली. त्याचे शिक्षण थोडे पोर्तुगीज व मराठी सातवीपर्यंत झाले असले तरी त्याचे वाचन अफाट होते. त्यावेळची ‘अमृत’, ‘चांदोबा’, ‘किर्लोस्कर’ ही मासिके तो नियमित घेऊन येई. शिवाय खांडेकर, सानेगुरुजी, रहस्यकथाकार मधुकर अर्नाळकर, गुरुनाथ नाईक आदींची पुस्तके त्याच्या वाचनात असायची. विशेषतः ‘अमृत’, ‘किर्लोस्कर’मध्ये काही वाचनीय असले की दादा मला ते वाचायला सांगायचा. वर्तमानपत्रांतील लेख, पत्रेही माझ्याकडून वाचून घ्यायचा व आपल्यालासुद्धा असे लिहिता आले पाहिजे व त्यासाठी खूप वाचन केले पाहिजे, असे सांगायचा. त्या सगळ्यांची आठवण झाली की आज आपण म्हणतो ‘वाचाल तर वाचाल’ हे किती सार्थ होते याचे स्मरण होते.
एकदा असेच एक पत्र लिहून मी एका दैनिकाला नाव, पत्त्यानिशी पाठवले. ते आठवड्याभरात प्रसिद्ध झाले. त्यावेळी मी माता सेकंडरीमध्ये नववीच्या वर्गात होतो. शाळेत वर्तमानपत्रे येत असत. त्यातील माझे ते पत्र वाचून शिक्षकांनी अभिनंदन केले व ‘आगे बढो’ अशा शुभेच्छा दिल्या. दुपारी शाळा सुटल्यावर घरी येतो तर दादाने ते पत्र वाचून मला वाचण्यासाठी खूण करून ठेवले होते. अर्थातच त्याच्याकडूनही मला शाबासकी मिळाली आणि त्याचा परिणाम म्हणून मग माझे दर महिन्या- दोन महिन्यांनी एखादे तरी पत्र छापून यायला लागले. असेच एक पत्र मा. यशवंतराव चौगुले यांच्या वाचनात आले. ते त्यावेळी मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यासंदर्भातच ते पत्र होते. एकदा ते शाळेला भेट द्यायला आले होते. इंटरव्हल असल्यामुळे आम्ही विद्यार्थी बाहेर खेळत होतो. ते कार्यालयात गेले व मला बोलावणे पाठवले. आम्ही कबड्डी खेळत होतो तेथे शिपाई आला व मला घेऊन कार्यालयात गेला. साहेब म्हणाले, ‘‘काय रे शंभू, हल्ली तुझे नाव पेपरात यायला लागले.’’ जवळच असलेले हेडमास्तर र. स. गुर्जर म्हणाले, ‘‘साहेब, अधूनमधून त्याचं काही ना काही चाललेलं असतं.’’ साहेब म्हणाले, ‘‘ते ठीक आहे, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस.’’ नंतर एस.एस.सी.पर्यंत मी अभ्यासाची पुस्तके सोडून फक्त चरित्र, आत्मचरित्रे वाचायचा सपाटा लावला. यासाठी शिक्षक मला प्रोत्साहन देत व आपणहून काही प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचायला देत. यात विशेषतः वि. स. खांडेकर, साने गुरुजी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, प्रा. अनंत काणेकर, केशवसुत, बालकवी या गाजलेल्या लेखकांची, कवींची पुस्तके असत.
एस.एस.सी.नंतर माझा चौगुले उद्योग समूहाच्या शाळेशी संबंध संपला व मग मी नोकरीनिमित्त साळगावकर उद्योग समूहाशी जोडला गेलो. मग विविध दैनिके, पुस्तके यातून वाचनाची गोडी वाढतच गेली. मग मी पत्रे लिहिण्याचा नाद सोडून कथा, कविता, लेख (नामांकितांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्ताने) लिहीत गेलो आणि गेल्या अर्धशतकाच्या कालावधीत पुस्तकांचे पावशतक पूर्ण केले. अर्थात, पुस्तकरूपाने जी पुस्तके लिहिली त्याची सुरुवात १९८६ पासून झाली. त्यापूर्वी पंधरा वर्षे मी खूप कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, लेख लिहिले आणि हे सारे प्रसिद्धही झाले. पण ते सारे साहित्य मी जपून न ठेवल्यामुळे त्याची पुस्तके प्रसिद्ध करता आली नाहीत; नपेक्षा निदान आणखी निवडक साहित्याची पाच-सहा पुस्तके प्रकाशित झाली असती.