कोविडमुळे गेली दोन वर्षे जवळपास बंदच स्थितीत असलेल्या शाळा काल विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या. कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून कधी ऑनलाइन, कधी ऑफलाइन, तर कधी आलटून-पालटून वर्ग अशा पद्धतीने सुरू असलेली राज्यातील विद्यालये कालपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली.
एका बाजूने नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच दुसर्या बाजूने राज्यात कोविड रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यालयांना वर्ग भरवताना कोविडच्या नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
बर्याच कालावधीनंतर विद्यालये सुरू झाल्याने काल नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.
एरव्ही दिवसभर खेळात व्यस्त असलेल्या मुलांची पावले काल शाळेकडे वळली. मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्यांचे पालक देखील आल्याने आवारात गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शालेय परिसर गजबजून गेला होता. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत शिक्षकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रत्येक शाळांजवळ वाहनांची मोठी वर्दळ होती. पालक आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी व नेण्यासाठी आले असता, काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
दरम्यान, शाळा सुरू झाल्याने पालकांनी खर्या अर्थाने आनंद व्यक्त केला. कारण गेली दोन वर्षे शाळा बंद असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे पालक चिंताग्रस्त होते. कधी एकदा शाळा सुरू होतात, याकडे पालकांचे लक्ष होते. ‘हुश्श झाली बाबा एकदाची शाळा सुरू’ असे म्हणत काल पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुख्यमंत्र्यांची शाळांना भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल भामई-उसगाव येथील ताराबाई दळवी हायस्कूलला, तसेच धारबांदोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.