- – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
समाजाच्या अभिरुचीला आरोग्यवर्धक वळण देणारी ‘मौज’ हवी. सभोवतालच्या सगळ्या समस्यांच्या यातना विसरून जीवनातील निर्मळ आनंद कसा लुटावा हे शिकवणार्या तंत्रांची ‘मौज’ आपल्याला हवी आहे.
जीवन हे अजब आहे. डोळ्यांवर ज्या रंगाची पट्टी लावावी, त्या पट्टीतून तशा रंगाचा उजेड दिसत असतो. जीवनाचीही मौज तशीच आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघा… जीवनात आनंद घेण्यासारखे खूपच आहे! ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ या शब्दांचा अनुभव घ्यायला मनाच्या गाभार्यात आनंदाचा प्रवेश व्हायला हवा.
रडत राहून जीवन सुसह्य होत नाही, तर हसर्या चेहर्याने दुसर्याला हसवता येते. दुसर्याच्या चेहर्यावरचे अश्रू पुसून त्याला जो हसवू शकतो तोच खरा जिंकला. हसवणे याचा अर्थ दुसर्याचे दुःख समजून घेणे आणि आपल्याला जसे शक्य होईल तशी मदत करून त्याच्या चेहर्यावरचा काळोख दूर करणे. चेहरा हा मनाचा आरसा आहे. मनाचे प्रतिबिंब चेहर्यावर दिसते. म्हणून मन जर प्रसन्न झाले तर चेहरा आपोआप उजळला जातो. म्हणून दुसर्याच्या मनातील व्यथा हळुवार फुंकर घालून नाहीशी करण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे.
काही स्त्रिया आणि पुरुष असे आपण समाजात पाहतो की त्यांच्या तोंडावर नेहमीच स्मितहास्य असते. याचा अर्थ त्यांना दुःख नसते का? सगळ्या दुःखाला पचवून आनंदाच्या दुनियेत राहण्याचे कसब आणि कौशल्य त्यांना अवगत असते. दुसर्याला आनंद वाटण्यासाठीच देवाने त्यांना जन्माला घातलेले असते. त्यांचा सदासर्वकाळ आनंदाने बहरलेला चेहरा पाहिल्यावर आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. दुःख कसे पचवावे हे आपण त्यांच्याकडून शिकावे.
या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा
या कवितेत मौजेचा धबधबा पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत फेसाळताना दिसतो. ‘स्वस्थ बसे, तोचि फसे’ या शब्दातला विनोद पहा. मौज करण्याचा हा क्षण आहे; आणि कोणीही या क्षणापासून वंचित होऊ नये. परत सहजासहजी अशी संधी तुम्हाला मिळणार नाही. या आणि आनंद घ्या व आनंद द्या, मौजेच्या या गंगेत मनसोक्त डुंबा, जीवनाचे सार्थक करा, असा संदेश या कवितेतून कवीला द्यायचा आहे. खरे म्हणजे दुःखाच्या सागरात कवीचे वैयक्तिक जीवन डुंबून गेले आहे; तरी आनंदाच्या सागराचा शोध कवीने चालूच ठेवला आहे.
लहान मुलांचे मन पवित्र असते. कोणतेही कपट, लोभ, स्वार्थ, मत्सर या शत्रूंचा स्पर्श त्यांच्या निर्मळ मनाला झालेला नसतो. म्हणूनच लहान मुलांना समोर ठेवून मौजेचे साम्राज्य सर्वांसाठीच कवी येथे प्रकट करतो.
पोर्तुगिजांच्या सत्तेतून गोवा मुक्त झाला आणि मुक्त गोव्यात पाश्चात्त्य देशांकडून हिप्पींचे तांडे यायला लागले. त्यांना विचारले की, ‘तुम्ही येथेच का येता?’ तर ‘गोवा इज ब्युटिफूल, वुई लव्ह गोवा’- हेच त्यांचे उत्तर असते.
त्यांच्यात काही डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, व्यापारी, जमीनदार, भांडवलदार असे उच्च श्रेणीतील व्यावसायिक असतात. व्यावहारिक प्रतिष्ठेची सगळीच आवरणे त्यांनी उतरविलेली असतात. अगदी सामान्यातल्या अतिसामान्य माणसाप्रमाणे त्यांची मौज चालू असते.
येथील सागरकिनार्यांवर लोळताना, वाळून बागडताना, सागराच्या लाटांबरोबर धुंद होऊन पाण्यात पोहताना त्यांचा आनंद सर्वांगातून प्रकट होतो. मौजेचा त्यांचा आस्वाद मोठमोठ्याने हसण्यातून आणि जोरजोरात खिदळण्यातून व्यक्त होतो. आजदेखील देशी आणि परदेशी पर्यटकांचे लोंढे गोव्याकडे सरकताना वर्षाचे बाराही महिने आपण पाहत असतो.
गोव्याकडे जावे, मौजमजा करून परत यावे एवढाच त्यांचा हेतू असतो. गोव्याचे नाव त्यांना तसाच संदेश देत असते. ‘गोआ’- ‘गो’ म्हणजे जा आणि ‘आ’ म्हणजे या, अशीच या आपल्या भूमीच्या नावातील मौज आहे.
मौज हवी पण ती बेशुद्धीतील नसून संपूर्णपणे शुद्धीतीलच हवी. आपल्याला मौज अपेक्षितच आहे; पण तिच्यावर बंधन असावे ते आपल्या सर्वश्रेष्ठ संस्कृतीचे. आपला समाज आपल्या डोळ्यांसमोरच व्यसनाधीन आणि बदफैली बनता कामा नये. समाजाच्या अभिरुचीला आरोग्यवर्धक वळण देणारी ‘मौज’ हवी. सभोवतालच्या सगळ्या समस्यांच्या यातना विसरून जीवनातील निर्मळ आनंद कसा लुटावा हे शिकवणार्या तंत्रांची ‘मौज’ आपल्याला हवी आहे.