सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या पार

0
22

>> नव्या ५० कोरोना रुग्णांची नोंद; गेल्या चार दिवसांतच १६८ रुग्णांची भर

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असून, गेल्या २४ तासांत नव्या ५० कोरोना रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आता दोनशेच्या वर गेली असून, सध्या राज्यात २१७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. २५ मेपर्यंत १०० च्या खाली असणारी सक्रिय कोरोना रुग्णसंख्या अवघ्या ९ दिवसांत दोनशेच्या वर पोहोचली आहे.
राज्यासह देशभरात हळूहळू कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचे तर हे संकेत नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज मोठ्या संख्येने सापडणार्‍या कोरोना रुग्णांमुळे ही शक्यता अधिक बळावली आहे. ३१ मे ते ३ जून या केवळ चार दिवसांचा विचार केल्यास या कालावधीत तब्बल १६८ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येने आता दोनशेचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या २४ तासांत ७८२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी ५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. कोरोना संसर्ग दरही वाढत असून, तो आता ६.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

१ लाख ८० हजार नागरिक बूस्टर डोससाठी अनुत्सूक

>> केवळ ५४ हजार जणांनीच घेतला तिसरा डोस

कोविडसाठीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस आतापर्यंत राज्यातील फक्त ५४ हजार लोकांनी घेतला असून, ज्यांना गंभीर स्वरूपाचे अन्य आजार आहेत, त्यांनी तसेच ६० वर्षांवरील नागरिकांनी बूस्टर डोस घ्यायला हवा, असे आवाहन लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले. सरकारी कर्मचारी, कोविड योद्धे व ज्येष्ठ नागरिक मिळून राज्यातील १ लाख ८० हजार जणांना मोफत बूस्टर डोससाठी पात्र आहेत; मात्र हे लोक त्यासाठी पुढे येत नसल्याने तो घेतलेल्यांची संख्या अवघी ५४ हजार एवढी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर व साथरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडेकर उपस्थित होते.

कोविडमुळे आता कुणाचा मृत्यू होत नाही. तसेच रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागत नाही. त्यामुळे आता लोक तिसरा डोस घेण्यास येत पुढे येत नसावेत, अशी शंकाही डॉ. बोरकर यांनी व्यक्त केली. ‘हर घर दस्तक’ या योजनेखाली आरोग्य खात्याने आता लोकांच्या घरी जाऊनही डोस देणे सुरू केले आहे. पण त्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करूनही खूपच कमी लोकांकाडून प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. बोरकर म्हणाले.
कोविडचा संसर्ग वाढू लागलेला असून, ४७ व ५० नवे रुग्ण आढळले आहेत. हे चौथ्या लाटेचे संकेत आहेत की काय हे एवढ्यातच सांगणे कठीण असल्याचे डॉ. गीता काकोडकर यांनी सांगितले.

राज्यात उद्या ‘टिका उत्सव’
राज्यात पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग वाढू लागलेला असून ही बाब लक्षात घेऊन आता आरोग्य खात्याने आठवड्यातून तीन दिवस लसीकरणाचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. गीता काकोडकर यांनी सांगितले. तसेच रविवार दि. ५ जून रोजी राज्यात ‘टिका उत्सवा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.