‘मोपा’वर पेडण्यातील ३३३ जणांना नोकर्‍या

0
18

गोवा सरकारच्या नागरी उड्डाण संचालनालयाने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी नोकर्‍यांबाबत माहिती काल जारी केली. आत्तापर्यंत मोपा विमानतळावर एकूण ४८९ जणांना नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. त्यात पेडणे तालुक्यातील ३३३ जणांचा समावेश असून, उर्वरित गोव्यातील १५७ जणांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मोपा विमानतळावर पेडण्यातील ५०० जणांना नोकर्‍या दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर मोपा विमानतळावरील नोकर्‍यांचा विषय चर्चेचा बनला होता. या पार्श्‍वभूमीवर नागरी विमान संचालनालयाने मोपा विमानतळाशी निगडीत कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसंबंधी माहिती काल जाहीर केली.

जीजीआयएएलमध्ये पेडण्यातील ६४ आणि उर्वरित गोव्यातील ४५ जण काम करीत आहे. आरएएक्सए सुरक्षा सेवेमध्ये पेडण्यातील ११६ आणि उर्वरित गोव्यातील १६ जण काम करीत आहेत. सोडॅक्सो इंडियामध्ये पेडण्यातील १७ आणि उर्वरित गोव्यातील ५ जण काम करीत आहेत. एमसीडीएमसीसी आणि त्याच्या कंत्राटदाराकडे पेडण्यातील १३६ आणि उर्वरित गोव्यातील ९१ जण काम करीत आहे, असे जाहीर प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कार्गो स्क्रीनरसाठी पेडण्यातील २८ आणि उर्वरित गोव्यातून १२ जण निवडण्यात आले आहे. कार्गो सुरक्षा सहाय्यक म्हणून पेडण्यातील २४ आणि गोव्याच्या उर्वरित भागातून ४ जण निवडण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे जवान म्हणून पेडणे तालुक्यातील ६९ आणि उर्वरित गोव्यातील २६ आहेत. त्यांना नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जातील.