>> मुख्यमंत्री; वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर घेतली आढावा बैठक
राज्यात पोलीस कायद्यात आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा घडवून आणण्यात येणार आहे. तसेच राज्यात ई-पोलीस सुविधा लवकरच सुरू केली जाणार असून, त्याद्वारे ऑनलाईन तक्रारी दाखल करता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस मुख्यालयातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसोबत बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. यावेळी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची उपस्थिती होती.
पोलीस खात्याकडून ई-पोलिसिंगची सुविधा उपलब्ध केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. किनारी भागातील गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी परिश्रम घेत आहेत. राज्यातील गुन्ह्यांच्या तपासाची टक्केवारी चांगली आहे. राज्यातील गुन्हेगारीमध्ये परप्रांतीय गुंतलेले आढळून येत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयाकडूनच हे गुन्हे केले जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सुमारे ३० हजार भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस यंत्रणेला दिली पाहिजे. ज्यांच्याकडून भाडेकरूची माहिती दिली जाणार नाही, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.