राज्यातील किनार्‍यांवर लक्ष ठेवणार ‘बीच व्हिजिल’ ऍप

0
21

>> मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऍप लॉंच; गैरप्रकार रोखण्यात मदत मिळणार

राज्यातील किनार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी काल ‘बीच व्हिजिल’ ऍपचा शुभारंभ करण्यात आला. या ऍपमुळे राज्यातील पर्यटन उद्योगाचा विकास होण्याबरोबरच सुधारणाही होणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

माहिती-तंत्रज्ञान आणि पर्यटन खात्यातर्फे गोवा बीच व्हिजिल ऍप लॉंच, नोंदणीकृत स्टार्टअप्सना प्रमाणपत्रांचे वितरण आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी पर्वरीतील सचिवालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ आणि सुरक्षित पर्यटनासाठी सर्वसमावेशक ऍप तयार करण्यासाठी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.
यावेळी माहिती-तंत्रज्ञान तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष गणेश गावकर, पर्यटन संचालक निखिल देसाई, इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवाचे विवेक एचपी, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल पर्यटन सचिव रवी धवन, माहिती व तंत्रज्ञान संचालक प्रवीण वोलवोतकर उपस्थित होते.

राज्यात पोषक वातावरण उपलब्ध करून स्टार्ट-अपला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्याची अर्थव्यवस्था वाढविण्यात स्टार्ट-अप्सचा मोठा वाटा आहे. त्यामुळे स्टार्ट-अपला पूर्ण उत्साहाने चालना देण्यासाठी सर्व संबंधितांनी सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अभियांत्रिकी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले आहे. या उपक्रमामुळे राज्यात अधिकाधिक टेक्नोक्रॅट्स निर्माण होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

रोहन खंवटे म्हणाले की, राज्यातील किनार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता ह्या मोबाईल ऍपचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील किनार्‍यांवर कोण कचरा टाकतो, तसेच किनार्‍यांवर पर्यटकांची होणारी सतावणूक व किनार्‍यांवरील अन्य गैरकृत्ये यावरही या ऍपद्वारे देखरेख ठेवता येणार आहे, अशी माहिती खंवटे यांनी दिली.

या ऍपमुळे पोलीस, दृष्टी संघटनेचे जीवरक्षक, किनार्‍यांची साफसफाई करणारी एजन्सी, शॅकमालक व राज्य पर्यटन खाते यांच्यात किनार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय साधता येणार असल्याचा विश्‍वास खंवटे यांनी व्यक्त केला. या समन्वयाअभावीच सध्या किनारी व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील नवीन स्टार्ट अप्स तसेच नवीन उद्योगांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अत्यंत गंभीर आहे. गोव्यात स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इकोसिस्टम सुधारण्यासाठी सरकार इतर राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करील. स्टार्टअप हे महसूल आणि रोजगार निर्मितीचे नवीन माध्यम बनले आहे, असेही खंवटे म्हणाले.
याप्रसंगी काही स्टार्ट-अप्सना स्टार्ट-अप पॉलिसी अंतर्गत आर्थिक मदत वितरित करण्यात आली आणि नोंदणीकृत स्टार्ट-अपसाठी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

स्टार्ट-अप्सना प्रमाणपत्र व निधी पुरवठ्यास वेग देण्याचे काम माहिती-तंत्रज्ञान खात्याने हाती घेतले आहे. प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी ७ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, असे माहिती-तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे सादर केलेली असतील, तर प्रोत्साहन निधी देण्याच्या कामाला एक किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही, असेही ते म्हणाले.

गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राखण्याच्या हेतूने पर्यटन खात्याने बीच व्हिजिल मोबाइल ऍप सुरू केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हे ऍप पर्यटन खाते, गोवा पोलीस, दृष्टी जीवरक्षक व शॅकमालकांसाठी उपलब्ध असेल. त्यानंतरच्या पुढील टप्प्यात नागरिकांना ते डाउनलोड करण्यासाठी आणि गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी उपलब्ध असेल.