>> बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलीच ठरल्या सरस; ३५ सरकारी विद्यालयांचा निकाल लागला १०० टक्के
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर केला. दहावीचा निकाल ९२.७५ टक्के एवढा लागला. दहावीच्या परीक्षेला एकूण २०,३४५ विद्यार्थी बसले होते. त्यातील १८,८६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १०,३५९ मुलगे बसले होते. त्यातील ९,४९१ उत्तीर्ण झाले. तसेच ९,९८६ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील ९,३७८ मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांच्या पेक्षा जास्त आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.९१ टक्के, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.६२ टक्के एवढे आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दहावीच्या परीक्षेत ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण ७.२५ टक्के मुलांना मिळाले. ३३ ते ४५ टक्के गुण २.३८ टक्के मुलांना, ४६ ते ५९ टक्के गुण २३.६५ टक्के मुलांना, ६० ते ८० टक्के गुण ५०.०५ टक्के मुलांना आणि ८१ ते १०० टक्के गुण १६.६७ टक्के मुलांना मिळाले आहेत. राज्यातील धारबांदोडा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९४.४४ टक्के आणि काणकोण तालुक्याचा निकाल सर्वात कमी ८८.२७ टक्के एवढा लागलो, असे शेट्ये यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेला खासगी १५२ विद्यार्थी बसले होते. त्यातील ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सात जणांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेले ३७ विद्यार्थ्यांपैकी २५ जण उत्तीर्ण झाले. फेरपरीक्षेस बसलेल्या ३८ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एनएसक्यूएफ विषय घेऊन २४८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील २४४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुमारे २४६ विद्यार्थी सातवा विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व व्यावसायिक विषय घेऊन ३४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच ४८० सीडब्लूएसएन उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातील ४६६ जण उत्तीर्ण झाले. असे शेट्ये यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेत १७ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणांमुळेच उत्तीर्ण झाले. एकूण ९१६ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले आहेत. दहावीच्या मुलांसाठी खगोलशास्त्र आणि फाईन आर्ट हे विषय प्रथमच उपलब्ध करण्यात आले होते. खगोलशास्त्र आणि फाईन आर्ट या दोन्ही विषयाचा निकाल १०० टक्के लागला. ११ विद्यालयातील ३२२ विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र विषय घेतला होता, तर ३ विद्यालयातील ४९ विद्यार्थ्यांनी फाईन आर्ट हा विषय घेतला होता. गणित लेव्हल १ विषय घेऊन ११,०१० विद्यार्थ्यांपैकी १०,७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गणित लेव्हल २ विषय घेऊन ८,८४६ विद्यार्थ्यांपैकी ८,०७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, असे शेट्ये यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार आढळून आला नाही. बारावीच्या परीक्षेत चार गैरप्रकार आढळून आले होते, असे शेट्ये यांनी सांगितले.
विद्यार्थी किंवा पालकांनी विद्यालयांकडून अधिकृत पत्र आणले तरी, विद्यार्थ्यांची गुणपत्रिका पर्वरीतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात दिली जाणार नाही. दहावीच्या निकालाबाबतचे सर्व विषय विद्यालय स्तरावरच सोडविले जातील, असे शेट्ये यांनी सांगितले.
दहावीची पुरवणी परीक्षा जुलै २०२२ च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोन केंद्रातून घेतली जाणार आहे. विद्यार्थी गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी १५ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांचे गुण पडताळणीबाबतचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. गुण पडताळणीसाठी विद्यालय पातळीवर तीन जणांची समिती कार्यरत असणार आहे. अर्जांचा या समितीकडून आढावा घेतला जाणार असून, संबंधित विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या ४ जून रोजी सकाळी ९ वाजता विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका म्हापसा, डिचोली, मडगाव, फोंडा, पर्वरी येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.
विशेष मुलांच्या दोन शाळांचा निकाल १०० टक्के
विशेष मुलांचे विद्यालय असलेल्या पर्वरी येथील संजय स्कूल आणि ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. ओल्ड गोवा येथील झेवियर विशेष मुलांच्या स्कूलचा निकाल ९४.४४ टक्के लागला.
११६ विद्यालयांचा निकाल १०० टक्के
राज्यातील ३५ सरकारी विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ७४ सरकारी अनुदानप्राप्त विद्यालयांचा निकाल १०० टक्के आणि ७ विनाअनुदानित विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील एकूण ११६ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.