पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना पूर्ण

0
17

>> निवडणुकीची तारीख अद्याप निश्‍चित नाही

येत्या जून महिन्यात हेात असलेल्या १८६ पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग फेररचनेचे कामकाज राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केले आहे. ही प्रभाग फेररचना करताना आयोगाने प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या अथवा मतदार, भोैगोलिक संलग्नता व नैसर्गिक सीमा, मतदान केंद्रासाठीचे अंतर (दोन कि. मी. च्या आत) या गोष्टी लक्षात घेतल्या आहेत. ह्या प्रभाग फेररचनेला अंतिम रूप देण्यापूर्वी जनतेकडून आलेल्या सूचनाही विचारात घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

पंचायत निवडणुकीसाठीच्या प्रभाग फेरचनेचे काम पूर्ण करुन ते अधिसूचित केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षणाचे काम हाती घेतले आहे. गोवा पंचायत राज्य कायदा, १९९४ साली हे आरक्षण करण्यात येणार असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी हे प्रभाग आरक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

या आरक्षणासाठीची वेगळी अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पंचायत निवडणुकांची तारीख आयोगाने अद्याप निश्‍चित केलेली नाही. निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या १८६ पंचायतींचा कार्यकाळ १९ जून रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत.