बर्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेरशी येथील प्रस्तावित गोवा बाजार प्रकल्पासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असून, या प्रकल्पाचे काम २ वर्षांच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे यांनी काल स्पष्ट केले. ग्रामीण विकास एजन्सीच्या सर्वसाधारण मंडळाच्या बैठकीनंतर काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
गोवा बाजार प्रकल्पासाठीची निविदा आता विनाविलंब काढण्यात येणार असून, काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवा बाजार प्रकल्प हा राज्यातील कलाकार व कारागीर आणि स्वयंसेवी गटांसाठी असेल. स्थानिक हस्तकला कलाकारांना त्यांच्या हस्तकलेला उत्तेजन देण्यासाठीचे ते एक प्रमुख केंद्र असेल, असेही गावडे यांनी सांगितले.